मुंबई - देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं थैमान घातलं आहे, सुरुवातीच्या काही महिने देशात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता. त्यानंतर, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेपासून घेतलेल्या धड्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत. तर, विद्यार्थ्यांचे निकालही गुणवत्तेचे निकष लावून जाहीर झाले आहेत. त्यामुळे, 2021 मध्ये पास होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच, बँकेतील एका भरतीच्या जाहिरातीने चांगलाच गदारोळ माजला आहे.
कोविड काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी (2021 passed out candidates) या नोकरीसाठी अर्ज करू नये (not eligible), असं स्पष्टपणे संबंधित जाहिरातीत लिहिण्यात आलं होतं. वर्तमानपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध होताच, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी एचडीएफसी बँकेनं घातलेल्या अटीवर टीका केली. त्यामुळे, वाढती टीका लक्षात घेऊन बँकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच नवीन जाहिरातही प्रसिद्ध केली आहे.
बँकेनं आपली चूक मान्य केली आहे. तसेच जाहिरात टाईप करत असताना, त्यामध्ये चूक झाल्याचं म्हटलं आहे. बँकेनं आता एक वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 2021 साली पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, असंही त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे. झालेल्या चुकीबद्दल बँकेकडून खेदही व्यक्त करण्यात आला आहे, यासंदर्भात झी न्यूजने वृत्त दिलं आहे. मात्र, या जाहिरातीमुळे पुन्हा एकदा 2021 पासआऊट विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधीबाबत तर्कवितर्क आणि चर्चा झडताना दिसून येते.
दरम्यान, संबंधित जाहिरात एचडीएफसी बँकेच्या तमिळनाडूतील मदुराई शाखेनं काढली होती. ज्यामध्ये 2021 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये, अशी अट ठेवण्यात आली होती. पण अवघ्या काही मिनिटांत ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली.