Join us  

स्वत:चेच ऐकवू नका, इतर देशांचेही ऐका! अर्थमंत्र्यांनी डब्ल्यूटीओला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 7:06 AM

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अमेरिकेत जाऊन ‘जागतिक व्यापार संघटने’ला (डब्ल्यूटीओ) खडेबोल सुनावले.

वॉशिंग्टन :

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अमेरिकेत जाऊन ‘जागतिक व्यापार संघटने’ला (डब्ल्यूटीओ) खडेबोल सुनावले. ‘डब्ल्यूटीओने अधिक प्रागतिक बनून सर्व देशांचे म्हणणे ऐकायला हवे. केवळ आपलेच म्हणणे सर्व देशांना ऐकवू नये’, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.अमेरिकेतील प्रसिद्ध विचार समूह ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’मध्ये सीतारामन यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, सुदैवाने २०१४ ते २०१७ या काळात भारताची वाणिज्यमंत्री म्हणून मला ‘डब्ल्यूटीओ’सोबत  काही काळ काम करता आले. त्यामुळे ‘डब्ल्यूटीओ’ने सर्व देशांबाबत निष्पक्ष असावे, असे मला वाटते. ज्या देशांकडे सांगण्यासारखे काही आहे, त्यांचे ‘डब्ल्यूटीओ’ने ऐकून घेतले पाहिजे. ‘डब्ल्यूटीओ’मध्ये आज अधिक खुलापणाची गरज आहे. जागतिकीकरणात अधिक पारदर्शकता यायला हवी, अशी भारताची भूमिका आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. 

भारताचे लक्ष आता डिजिटलीकरणावर- सीतारामन म्हणाल्या की, देशाच्या सर्व लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्याचे उद्दिष्ट जवळजवळ प्राप्त केले आहे. आता भारताने लोकांना अधिक कुशल डिजिटलीकरणावर तसेच  बनविण्यावर लक्ष दिले आहे. 

भारत गुंतवणुकीचे आकर्षक स्थळ- भारत जागतिक पातळीवर गुंतवणुकीसाठी एक आकर्षक केंद्र बनला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता मजबूत स्थितीत आहे. डॉलरच्या संदर्भात भारतीय अर्थव्यवस्था ५ व्या स्थानावर झेपावली आहे.

टॅग्स :निर्मला सीतारामन