कोणत्याही वैध कारणाशिवाय किंवा आर्थिक लाभाशिवाय तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्डचे तपशील कोणालाही देऊ नका. अन्यथा तुमची फसवणूक करत जीएसटी चोरी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो, असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) म्हटले आहे.
सीबीआयसीने म्हटले आहे की, आधार आणि पॅन तपशिलांचा वापर करून बनावट संस्था तयार केल्या जातात. त्यामुळे लोकांनी आधार, पॅन कार्ड कोणत्याही वैध कारणाशिवाय इतरांना देणे टाळावे. गेल्या काही वर्षांत, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अधिकाऱ्यांनी अनेक बोगस कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे ज्यांचा वापर मालाचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बनावट पावत्या तयार करून फसवणूक करण्यासाठी केला जात होता.
लाखोंना बसतो फटका
- आधारचा गैरवापर करून बँकिंग फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस समोर येत आहेत.
- बँका नेहमी त्यांच्या ग्राहकांना याबाबत सतर्क करत असतात.
- मात्र त्यानंतरही ग्राहक आपला वैयक्तिक तपशील शेअर करत फसवणूक करून घेतात.
- यामुळे लाखो रुपये खात्यातून काढले जातात.