लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय म्हणून सोने देशात शेकडो वर्षांपासून लोकप्रिय आहे. भाव कितीही वाढले तरी सोन्याचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही. पण आता प्रत्यक्ष सोन्याऐवजी लोकांना डिजिटल सोने अधिक पसंत पडू लागले आहे.
शुद्धतेची खात्री आणि चोरीला न जाण्याची खात्री यामुळे लोक या पर्यायाकडे वळू लागले आहेत. ‘नावी’ या वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपनीने केलेल्या पाहणीतून हा बदल समोर आला आहे. हा पर्याय नेमका का अधिक आवडू लागला आहे, याबाबत लोकांमध्ये नेमके कोणते गैरसमज आहेत हे यातून शोधण्याचा प्रयत्न या सर्व्हेमधून करण्यात आला. सोन्याच्या बहुतांश ग्राहकांना आजही सोनाराकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष सोन्याचे आकर्षण वाटते. खऱ्या सोन्याप्रमाणे डिजिटल सोन्याला स्पर्श करता येत नाही, ही बाब त्यांना खटकताना दिसते.
आकर्षक, आधुनिक पर्याय
- सोन्याच्या दागिन्यांचे प्रेम महिलाच नव्हे तर पुरुषांमध्येही आहे. सणासुदीच्या काळात दागिने मोठ्या प्रमाणावर घातले जात असतात. परंतु चोरीच्या भीतीने दागिने नेहमी घालणे शक्य नसते. त्यामुळे दागिने एकतर घरच्या तिजोरीत वा बँकेच्या लॉकरमध्ये असतात.
- हा गुंतवणुकीचा आकर्षक व आधुनिक पर्याय आहे. ग्राहकांना अद्यापही सोनाराकडून घेतलेले म्हणजेच खरे सोन असे वाटते. डिजिटल सोन्याचे नेमके काय फायदे असतात, ते किती शुद्ध असते, चोरी होण्याची भीती असते का, आदी बाबी या लोकांना फारशा माहीत नाहीत.
पाहणीतून काय समोर आले?
- ६७% जणांना आजही या सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे होतात, याचे नेमके काय फायदे, आहेत याची माहिती नाही.
- ५०% जणांना वाटते की, डिजिटल सोन्याचे मागील काही दिवसात चांगला परतावा दिला आहे.
- ४४% जणांना अजूनही असे वाटते की, प्रत्यक्ष सोन्याच्या स्पर्शामुळे मिळणारा आनंद डिजिटल सोन्याच्या स्पर्शाने मिळू शकत नाही.
- ३९% जणांना वाटते की, सोने प्रत्यक्ष घरी ठेवण्यापेक्षा डिजिटल स्वरुपातील सोने खूप सुरक्षित असते. हे चोरी होण्याची भीती नसते.
- ३६% ग्राहकांना वाटते की डिजिटल सोने २४ कॅरेट सोन्याइतकेच शुद्ध असते. या सोन्याची शुद्धता कालांतराने अजिबात कमी होत नाही.
- २५% जणांच्या मते याची विक्री ॲपने होते. सर्व व्यवहार ॲपने करणे सोयीचे आणि सोपे आहे.