चंद्रकांत दडस, उपसंपादक
जगभरात सध्या मंदी आणि विक्री कमी झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. ट्विटर, मेटा, गुगल, ॲमेझॉनसह जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही नोकरीच्या सुरक्षिततेची काळजी असेल. नोकरी गेली तर घर चालवण्यासह कर्जाचा ईएमआय भरणे खूप कठीण होते. अशा संकटावर मात करण्यासाठी नोकरी विमा खरेदी करू शकता.
काय आहे जॉब इन्शुरन्स?
विमा कंपन्या ही पॉलिसी नोकरदार लोकांना देतात. ही पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाने आपली नोकरी गमावल्यास, विमा कंपनी अटींनुसार त्याचे सर्व ईएमआय भरते. मात्र, नोकरी विमा भारतात स्वतंत्र पॉलिसी म्हणून उपलब्ध नाही. ही मुख्य पॉलिसीसह रायडर किंवा ॲड ऑन कव्हर म्हणून उपलब्ध आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराचे उत्पन्न पगाराच्या स्वरूपात असले पाहिजे.
प्रीमियम आणि कव्हरची मुदत
जॉब इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम सामान्यतः एकूण कव्हरेजच्या ३% ते ५% पर्यंत असतो. जर गृहकर्जांतर्गत नोकरी विमा पॉलिसी घेतली असेल तर त्याचा कालावधी पाच वर्षांचा असेल. जॉब लॉस इन्शुरन्स अत्यंत मर्यादित पद्धतीने फायदे देते. अनेक कंपन्या निव्वळ उत्पन्नाच्या केवळ ५० टक्केच रक्कम देतात. जॉब इन्शुरन्स अंतर्गत कंपन्या खूप कमी कालावधीसाठी विमा संरक्षण देतात. यामध्ये,
आरोग्य विमा पॉलिसीप्रमाणे, प्रतीक्षा कालावधी ३० ते ९० दिवस किंवा जास्तीत जास्त चार महिने असतो. त्याचप्रमाणे पॉलिसीची मुदतदेखील एक ते पाच वर्षांपर्यंत बदलते. इतकंच नाही तर कंपनी योजनेंतर्गत तुमचे तीन ते चार ईएमआय भरते, त्याआधी तुम्हाला स्वतःसाठी नवीन नोकरी शोधावी लागते.
जॉब इन्शुरन्स घेण्यापूर्वी हे करा
पॉलिसीच्या अटींनुसार नोकरी गमावल्यास विमाधारकाला आर्थिक मदत मिळते. विमा कंपनी विशिष्ट कालावधीसाठी ईएमआय भरते. जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरच्या अटी आणि शर्ती वेगवेगळ्या असतात. फसवणूक, भ्रष्टाचार किंवा इतर गैरकृत्यांमुळे नोकरी गेली तर त्याचा लाभ मिळत नाही. प्रोबेशन कालावधीदरम्यान नोकरी गेली तर विमा संरक्षण मिळत नाही. हे विमा संरक्षण तात्पुरते किंवा कराराखाली काम करणाऱ्या लोकांना दिले जात नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"