Rent vs Real Estate : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु अनेकदा घरांच्या वाढत्या किंमती आणि आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे ते शक्य होत नाही. तर दुसरीकडे, शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे घरांच्या किमती वाढत आहेत, तर दुसरीकडे भाड्याचा खर्चही झपाट्यानं वाढत आहे. महागाईचा फटका दोन्ही बाजूंना बसतोय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात हे आव्हान आता मोठ्या शहरांमध्ये संकट बनत असल्याच सांगण्यात आलंय.
अहवालानुसार, भारतातील घरांच्या सरासरी किमती आणि भाड्याच्या किंमती या वर्षी कन्झुमर इन्फ्लेशनपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. रॉयटर्सनं एका सर्वेक्षणात म्हटल्यानुसार, प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक असू शकते. मंदावलेला आर्थिक विकास, रखडलेले वेतन आणि चांगल्या नोकऱ्यांचा अभाव यामुळे लाखो नोकरदार कुटुंबांची बचत कमी झाली आहे. तर दुसरीकडे गृहनिर्माण क्षेत्रात गेल्या दशकभरात घरांच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
भाड्यानं घर घेतलं, आता...
अहवालानुसार, मजबूत मागणी आणि मर्यादित पुरवठा यांच्यातील असमतोलामुळे घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की लाखो लोकांना भाड्यानं राहावं लागत आहे. भारतातील घरांच्या सरासरी किमती या वर्षी ६.५ टक्के आणि पुढील वर्षी ६.० टक्क्यांनी वाढणार आहेत. घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बहुतांश लोक भाड्यानं राहतात, असं रिअल इस्टेट मार्केट तज्ज्ञांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय.
शहरी भाड्याचा खर्च आणखी वेगानं वाढण्याची शक्यता आहे, जी येत्या वर्षात ७ ते १०% वाढू शकते. ही वाढ ग्राहक महागाईपेक्षा कितीतरी जास्त असेल, जी पुढील दोन आर्थिक वर्षांत सरासरी ४.३% आणि ४.४% राहण्याचा अंदाज आहे. भाडं वाढल्यानं घर खरेदीचा मार्ग अधिकच खडतर झाला असून, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना डाऊन पेमेंटसाठीही बचत करण्याची धडपड करावी लागत आहे.
भाडं गगनाला भिडलं
महागाईपेक्षा घरांच्या किमती झपाट्यानं वाढतील आणि अनेक वर्षांपासून भाडं गगनाला भिडलं आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लाखो लोकांसाठी घर घेणं हे दूरचं स्वप्न बनत चाललंय. ही केवळ एक समस्या नसून त्याभोवती अनेक समस्या वाढत असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलंय. सध्या आपण अशी गृहनिर्माण बाजारपेठ पाहत आहोत जिथे केवळ श्रीमंतांनाच खरेदी करता येतंय आणि हा ट्रेंड लवकरच बदलेल असं वाटत नाही. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये घरांच्या सरासरी किमती या वर्षी आणि पुढील वर्षी ५.८ ते ८.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पन्नास टक्के तज्ज्ञांनी भविष्यात ही परिस्थिती सुधारेल, असं म्हटलंय, तर ५० टक्के तज्ज्ञांनी परिस्थिती आणखी बिकट होईल, असं म्हटलंय.