Join us

६ महिन्यांत पैसे दुप्पट, गुंतवणूकदार मालामाल; रेल्वे कंपनीचे शेअर्स ५२ सप्ताहांच्या उच्चांकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 9:22 AM

शुक्रवारी कंपनीचे बाजार भांडवल १.४८ लाख कोटी रुपये होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय रेल्वेची उपकंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (आयआरएफसी) समभागांनी गुंतवणूकदारांना मालमाल केले आहे. मागील ६ महिन्यांत कंपनीचे समभाग २४० टक्के वाढून ५२ सप्ताहांच्या उच्चांकावर गेले आहेत. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, मागील १ महिन्यात आयआरएफसीच्या समभागांत ३६ टक्के वृद्धी झाल्याचे दिसत आहे. या अभूतपूर्व तेजीमुळे आयआरएफसीचे बाजार भांडवल वाढून सुमारे १.५ लाख कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारी कंपनीचे बाजार भांडवल १.४८ लाख कोटी रुपये होते.

१० दिवसांत १० कोटी शेअर्सची खरेदी-विक्री

शुक्रवारी बीएसई आणि एनएसईवर पहिल्या १ तासात कंपनीच्या ९२.८९ दशलक्ष समभागांची खरेदी-विक्री झाली. १० दिवसांत कंपनीच्या १० कोटी समभागांची खरेदी-विक्री झाली. बीएसईत आयआरएफसीचा समभाग इंट्रा-डे ५२ सप्ताहांच्या उच्चांकावर पोहोचला तेव्हा समभागाची किंमत ११३.५० रुपये होती.

रेल्वेच्या विस्तारात मोठे योगदान

आयआरएफसी ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी देशांतर्गत तसेच विदेशी भांडवल बाजारातून भांडवल उभे करण्याचे काम करते. रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणात असलेली ही कंपनी एक ‘मिनीरत्न’ समजली जाते. ती अनूसूची ‘ए’ सार्वजनिक क्षेत्र उद्योग आहे. रिझर्व्ह बँकेकडे तिची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आणि पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी म्हणून नोंदणी आहे. भारतीय रेल्वे आणि अन्य संबंधित संस्थांच्या विस्तारात कंपनीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

टॅग्स :रेल्वेगुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार