Join us

तीव्र स्पर्धा : यावर्षी आयटी कंपन्यांनी दिली दुहेरी वेतनवाढ, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 7:48 AM

२ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ॲक्सेंचर इंडियाने डिसेंबरच्या अखेरीस वार्षिक वेतनवाढ, बोनस आणि पदोन्नत्या दिल्या होत्या.

बंगळुरू : गेल्या वर्षी कोविड-१९ लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ लांबणीवर टाकणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांनी यंदा अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने दुसरी वेतनवाढ दिली आहे. गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून त्यातून कर्मचाऱ्यांना दोन-दोन वेतनवाढी मिळाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.२ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ॲक्सेंचर इंडियाने डिसेंबरच्या अखेरीस वार्षिक वेतनवाढ, बोनस आणि पदोन्नत्या दिल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीत दुसऱ्यांदा पदोन्नत्या देण्यात आल्या. कंपनीने सांगितले की, एप्रिलमध्ये सहयोगी संचालक पातळीवरच्या लोकांना एकरकमी ‘थँक यू बोनस’ देण्यात आला. येत्या जूनमध्ये आम्ही पुन्हा पदोन्नत्या देणार आहोत. गेल्या डिसेंबरमध्ये पदोन्नत्या देऊन ६०५ जणांना एमडी, तर ६३ जणांना एमडी करण्यात आले होते. त्यात महिलांची संख्या विक्रमी होती.टीसीएसनेही  सहा महिन्यांत दुसरी वेतनवाढ देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिलपासून प्रभावी असलेल्या पहिल्या वेतनवाढीत कंपनीने ६ ते ८ टक्क्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला आहे. विप्रोचे सीईओ थेरी डेलापोर्ट यांनी सांगितले की, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जूनपासून वेतनवाढ देणार असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एचसीएलचे मुख्य एचआर अधिकारी अप्पाराव व्ही. व्ही. यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही वेतनवाढ एका तिमाहीने पुढे ढकलली होती. यंदा नेहमीप्रमाणे जुलैमध्ये वाढ दिली जाईल.टेक महिंद्राचे जागतिक लोकाधिकारी हर्षवेंद्र सोनी यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून प्रभावी असलेली वेतनवाढ आम्ही नुकतीच दिली आहे.गतवर्षीच्या मार्च महिन्यामध्ये  करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनपासून अनेक कंपन्यांनी घरूनच काम करण्यास आपल्या कर्मचा-यांना परवानगी दिली आहे. 

इन्फोसिस देणार १० ते १४ टक्के वाढइन्फोसिसचे ईव्हीपी आणि एचआर प्रमुख रिचर्ड लोबो यांनी सांगितले की, या वर्षातील दुसऱ्या वेतनवाढीची प्रक्रिया सध्या कंपनीने सुरू केली आहे. गेल्या वर्षी वेतनवाढ रोखून धरण्यात आली होती. यंदा जानेवारीपासून प्रभावी असलेली पहिली वेतनवाढ यापूर्वीच देण्यात आली.  दुसरी वेतनवाढ जुलैपासून प्रभावी असेल. दोन्ही प्रक्रिया मिळून सर्व पातळ्यांवरील कर्मचाऱ्यांना १० ते १४ टक्क्यांची वाढ मिळेल. 

टॅग्स :कर्मचारीमाहिती तंत्रज्ञान