मुंबई : चार दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९१.४७ अंकांनी वाढून २४,४७९.८४ अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारांतील तेजी आणि देशांतर्गत खरेदीचा जोर यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले.भांडवली वस्तू, पायाभूत सेवा, बँकिंग, जमीनजुमला, ऊर्जा, आरोग्य सेवा, वाहन आणि तेल व गॅस या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत जोरदार खरेदी झाली. आजचा दिवस नव्या वर्षातील सर्वाधिक लाभ देणारा ठरला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढत गेला. सत्राच्या अखेरीस २९१.४७ अंकाची अथवा १.२१ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २४,४७९.८४ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी, गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने तब्बल ६६६ अंक गमावले आहेत. निर्यातीतील घट, जागतिक बाजारांतील घसरण आणि उतरलेले कच्चे तेल याचा फटका बाजारांना बसला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८४.१0 अंकांनी अथवा १.१४ टक्क्यांनी वाढून ७,४३५.१0 अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारांतही तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.७५ अंकांपर्यंत वाढले. क्षेत्रनिहाय विचार करता भांडवली वस्तू निर्देशांक सर्वाधिक २.८५ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल पायाभूत सोयी, बँकेक्स, जमीन जुमला, आरोग्य सेवा, ऊर्जा आणि तेल व गॅस यांचे समभाग वाढले. जागतिक बाजारांपैकी हाँगकाँग, जपान आणि शांघाय येथील बाजार ३.२२ टक्क्यांपर्यंत वाढले. युरोपीय बाजारांतही सकाळी तेजीचे वातावरण दिसून आले. (वृत्तसंस्था)
घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स उसळला
By admin | Published: January 20, 2016 3:10 AM