बोस्टन : अमेझॉन, बर्कशायर हॅथवे व जेपी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीची धुरा डॉ. अतुल गावंडे या ५२ वर्षांच्या मराठी व्यक्तीकडे सोपविली आहे. अतुल गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या तिन्ही कंपन्यांनी बुधवारी गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.
अमेरिकेतील लोकांना अत्यल्प दरात उत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या तिन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. तसे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीरच केले. या नव्या कंपनीचे मुख्यालय बोस्टनमध्ये असेल. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे एंडोक्राइन सर्जन आहेत. ते हार्वर्ड टीएन चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थमध्ये आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक असून, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत.
कमी खर्चात चांगल्या आरोग्य व वैद्यकीय सेवा देणे शक्य आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे ना नफा तत्त्वावर आम्ही ही कंपनी सुरू करीत आहोत, असे बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांनी स्पष्ट केले. डॉ. गावंडे या कामात आम्हाला यश मिळवून देतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. अतुल गावंडे अनेक वर्षे अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी काम करीत असून, अमेरिकेतील वैद्यकीय उपचार, आरोग्य व त्यावरील खर्च यावर त्यांनी अनेकदा सडकून टीकाही केली आहे. अतुल गावंडे जसे डॉक्टर म्हणून प्रख्यात आहेत, तसेच आरोग्यविषयक वृत्तपत्र लिखाण व अन्य संशोधन यामुळे त्यांच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आहेत. डॉ. गावंडे यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अतुल यांचा जन्मही अमेरिकेतीलच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय वंशाचे अमेरिकन म्हणता येईल. (वृत्तसंस्था)
>ओबामा केअरमध्येही त्यांचा मोठा वाटा
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. अमेरिकेत राबविण्यात आलेल्या ओबामा केअर या आरोग्य योजनेमध्ये डॉ. गावंडे यांचा मोठा वाटा होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ती बंद केली. मात्र ओबामा केअरच्या आधारे भारतात सुरू होत असलेली आयुष्यमान योजना आता मोदीकेअर नावाने ओळखली जात आहे.
अमेरिकेतील वैद्यकीय योजनेची सूत्रे डॉ. अतुल गावंडे यांच्याकडे
अमेझॉन, बर्कशायर हॅथवे व जेपी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीची धुरा डॉ. अतुल गावंडे या ५२ वर्षांच्या मराठी व्यक्तीकडे सोपविली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:15 AM2018-06-22T01:15:08+5:302018-06-22T01:15:08+5:30