Join us  

स्वस्त विमान प्रवासाचे स्वप्न हवेतच; ७७४ पैकी केवळ ५४ हवाई मार्गांवर चालली उडान योजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 9:23 AM

कॅगच्या अहवालात खुलासा

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात स्वस्तात विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उडान योजनेची कामगिरी निराशाजनक राहिली असल्याचे भारताचे नियंत्रक व महालेखापाल (कॅग) यांच्या अहवालातून समोर आले आहे. २०१७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनेतून दूरवर्ती भागांना हवाई मार्गांनी जोडणे तसेच छोट्या शहरांची संपर्क व्यवस्था अधिक चांगली करणे, हा उडान योजनेचा मूळ उद्देश होता. मात्र, हा उद्देश साध्य होऊ शकला नाही.

तिकीट विक्रीत आढळली गडबड

सवलतीच्या दरातील तिकिटे आधी विकून नंतर विना सवलतीची तिकिटे विकली जाणार होती. तथापि, कंपन्यांनी यात गडबड केल्याचे काही कंपन्यांच्या तिकिट व्यवस्थेच्या तपासणीत आढळून आले. सवलतीची तिकिटे किती उपलब्ध आहेत, याची माहितीच कंपन्या प्रवाशांना देत नव्हत्या.

योजना का फसली?

- विमानतळ आणि धावपट्ट्यांचा विकास  वेळेत झाला नाही. - योजनेसाठी ११६ विमानतळ व धावपट्ट्या निवडण्यात आल्या होत्या. - ८३ ठिकाणी विमान उडालेच नाही.

काय सांगतो कॅगचा अहवाल?

७७४ : हवाई मार्गांची निवड उडान योजनेअंतर्गत करण्यात आली होती.

४०३ : मार्गांवर विमान उड्डाणे सुरू झालीच नाही.

३७१ : मार्गांवर उड्डाने सुरू झाली, त्यातील केवळ ११२ मार्गांवर ३ वर्षे परिचालन कायम राहिले. बहुतांश मार्ग त्याआधीच बंद पडले.

५४ : हवाई मार्गांवर मार्च २०२३पर्यंत केवळ विमान उड्डाणे सुरू राहू शकली.

 

टॅग्स :विमानविमानतळ