Join us

पेट्रोल-डिझेल किमती घटण्याचे स्वप्न भंगले; सौदीकडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपातीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 10:36 AM

कच्च्या तेलाचे दर घसरत असताना देशात पेट्राेल आणि डिझेलच्या किमती घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कच्च्या तेलाचे दर घसरत असताना देशात पेट्राेल आणि डिझेलच्या किमती घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत हाेती. मात्र, साैदी अरेबिया आणि इतर ओपेक देशांनी पुन्हा कच्च्या तेलाचे उत्पादन घटविण्याची घाेषणा केली आणि इंधन स्वस्त हाेण्याचे स्वप्न भंगले. साैदीच्या घाेषणेनंतर साेमवारी कच्च्या तेलाचे दर १ डाॅलर प्रति बॅरलने वाढले. 

गेल्या काही आठवड्यांपासून भारताला सरासरी ७२ डाॅलर प्रति बॅरल या दराने कच्चे तेल मिळत हाेते. रशियाकडून आयात वाढविल्यामुळे भारताला बराच फायदा झाला. त्यामुळे तेल कंपन्यांचा ताेटा भरून निघण्यास माेठा हातभार लागला. कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलचे दर घटण्याची अपेक्षा करण्यात येत हाेती. मात्र, ओपेकच्या निर्णयामुळे ही अपेक्षा धुळीस मिळाली आहे. ओपेकने यापूर्वी दाेन वेळा उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, त्यानंतरही कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिले. गेल्या काही आठवड्यांत दर कमी झाले आहेत.

साैदी अरेबियाच्याकडून हाेणारी कच्च्या तेलाची आयात ५.६ लाख टन एवढी झाली आहे. हा २०२१ नंतरचा निचांकी आकडा आहे. एकूण ओपेक देशाकडून हाेणारी आयात माेठ्या प्रमाणावर घटली आहे. ५ लाख बॅरल दरराेज एप्रिल महिन्यातमध्ये १० लाख बॅरल दररोजची घट मे महिन्यात कपात

साैदीने काय केली घाेषणा?

- जुलैपासून तेल उत्पादन दरराेज १० लाख प्रति बॅरल एवढी कपात केली जाईल. - ओपेक व इतर संलग्नित उत्पादक देश पुरवठ्यातील कपात २०२४ च्या अखेरपर्यंत वाढविण्यास सहमत झाले आहेत. 

रशियाकडून रेकाॅर्ड तेल खरेदी

- भारताला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळत आहे. - मे महिन्यात रशियाकडून भारताने रेकाॅर्डब्रेक तेल खरेदी केली. - दरराेज १९.६ लाख बॅरल एवढे कच्चे तेल आयात केले. एप्रिलच्या तुलनेत ते १५% जास्त आहे.

खासगी कंपन्यांची बाजार भावानुसार तेलविक्री

देशातील काही खासगी तेल कंपन्यांनी बाजार भावानुसार पेट्राेल आणि डिझेलची विक्री गेल्या महिन्यात सुरू केली. या कंपन्या सरकारी कंपन्यांपेक्षा १ रुपये स्वस्तात पेट्राेल विक्री करीत आहेत. मात्र, ओपेक निर्णयानंतर त्यांनाही इंधन दराबाबत विचार करावा लागेल.

 

टॅग्स :पेट्रोलडिझेल