मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागांतर्गत मूर्तिजापूर आगारात बस गाड्या आणि कर्मचार्यांची वानवा असल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट होत असून, प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मूर्तिजापूर आगाराची स्थापना साधारण ११ वर्षांपूर्वी झाली होती. या आगाराचे लोकार्पण ५ मे २०१३ रोजी झाले. तेव्हापासून या आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी प्रयत्न केले; परंतु आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. मोजक्याच संख्येतील चालक, वाहक आणि बस गाड्यांच्या भरवशावर आगाराचे काम सुरू आहे. मूर्तिजापूर शहराला रेल्वे जंक्शनचा दर्जा प्राप्त झाला असून, मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हासुद्धा या शहरातून जातो; परंतु त्याचा काहीच फायदा या आगाराला होत असल्याचे दिसत नाही. येथे आगार व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या अनेकांनी या आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले; परंतु बस गाड्या आणि चालक-वाहकांच्या अपुर्या संख्येमुळे त्यांचे प्रयत्नही फलद्रूप झाले नाहीत. मूर्तिजापूर आगारातून लोणार, पांढरकवडा, नागपूर, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक , पुणे, हिंगोली, नांदेड, परभणी, रामटेक, निजामाबाद, औंढा नागनाथ, माहूर, धुळे, इंदूर आदी ठिकाणांसाठी लांब पल्ल्याच्या बस गाड्या सुरू करणे आवश्यक झाले आहे; मात्र यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे सहकार्यही तेवढेच गरजेचे आहे. वरील लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू केल्यास मूर्तिजापूर आगाराचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते. त्यामुळे अमरावती प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक अकोला यांनी काळजीपूर्वक विचार करून मूर्तिजापूर आगाराला चालक-वाहकांसह पुरेशा प्रमाणात नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
मूर्तिजापूर आगारात गाड्या आणि कर्मचार्यांची वानवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मूर्तिजापूर आगारात बस गाड्या आणि कर्मचार्यांची वानवा !
By admin | Published: May 18, 2014 07:57 PM2014-05-18T19:57:04+5:302014-05-18T20:58:42+5:30