जगातील सर्वात मोठा औषध बाजार असलेल्या अमेरिकेत सध्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. स्तनाच्या कॅन्सरपासून ब्लॅडर, किमोथेरेपीसाठी लागणाऱ्या औषधांची कमतरता आहे. अमेरिकेतील औषध तुटवड्याच्या संकटात भारतीय औषध निर्माता कंपन्यांना फायदा होऊ शकतो. भारतीय औषध निर्मात्यांना अमेरिकेतील या तुटवड्यामुळे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये चांगली कमाई होऊ शकते असं मुंबईतील रेटिंग्स अँन्ड रिसर्च कंपनीनं म्हटलं आहे.
भारतात जेनेरिक औषधे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जातात. त्यात मोठे ड्रगमेकर्स डॉ. रेड्डीज, सिपला, सन फार्मा देशाबाहेर अमेरिका, युरोप येथे चांगली कमाई करत आहेत. अमेरिका त्यांच्याकडील बहुतांश औषधे भारतातून आयात करते. भारतीय कंपन्यांना अमेरिकेत दिवाळखोरी निघालेल्या जेनेरिक कंपन्यांना मैदानाबाहेर फेकण्याची संधी मिळेल. भारतात नवीन उत्पादने लॉन्च करून त्याचा व्यापार वाढवू शकतो.
अमेरिकेत अशी परिस्थिती का?
अमेरिकेत औषधांचा तुटवडा सध्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजनं म्हटलं की, आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये ३००-३१० औषधांचे दर स्थिर राहिल्यानंतर २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ३२३ औषधांच्या किंमती वाढल्या. एप्रिलपर्यंत २२ आरोग्य केंद्रात २३३ औषधांचा तुटवडा जाणवला. अमेरिका पुरवठादार साखळीचीही चौकशी करणार आहे.
कोविड लॉकडाऊन काळात सीजनल आजारांपासून ठीक होण्यासाठी औषधांची मागणी वाढली होती. फार्मा कंपन्यांवर या मागणीच्या पूर्ततेसाठी दबाव वाढला होता. त्यातच रशिया यूक्रेन संकटामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला. त्यामुळे जेनेरिक औषध उत्पादकांना त्याचा फटका बसला. त्याशिवाय जेव्हा औषधांच्या तुटवड्याची घोषणा झाली तेव्हा लोकांनी औषधांचा साठा घरी करण्यास सुरुवात केली.
वाढत्या उत्पादन खर्चामुळे अमेरिकन बेस्ड जेनेरिक फार्मा कंपन्यांनी काही औषधांचं उत्पादन थांबवलं आहे. त्यात नवीन औषध निर्मितीच्या प्रशासकीय परवाना घेण्याची प्रक्रियाही गुंतागुतीची बनली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्या पुरवठा साखळीचा विस्तार करून आरोग्य क्षेत्रातील भागीदारी वाढवून हा तुटवडा भरू शकतात.