मुंबई : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त तुम्ही देशातील कोणत्याही प्रमुख शहरात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सहलीचे ठिकाण निश्चित करण्यापूर्वी विमान प्रवासाचे दर तपासून घ्या. कारण, तुम्हाला देशांतर्गत प्रवासापेक्षा दुबई, बँकॉकसारख्या ठिकाणचे विमान तिकीट स्वस्तात उपलब्ध होऊ शकते.
कोरोना निर्बंध पूर्णपणे हटल्याने अनेकांनी यंदा दिवाळीच्या सुट्टीमध्ये सहलींचे नियोजन केले आहे. प्रवासाच्या वेळेत बचत करण्यासाठी अनेक लोक विमान प्रवासाला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत विमान प्रवासासाठी वाढलेले बुकिंग लक्षात घेता देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाढ केल्याचे दिसून येते.
मुंबई-दिल्ली प्रवास महाग या प्रवासाची परतीच्या तिकिटाची किंमत १५ हजार ते २२ हजार रुपयांवर पोहोचली आहे. सामान्यपणे मुंबई ते दिल्ली प्रवासाचे तिकीट ऐनवेळी बुकिंग केले तरी ८ ते १२ हजारांच्या दरम्यान असते. आगाऊ बुकिंग केले तरी, ते ६ ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध होते. मात्र, चालू आठवड्यापासूनच दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, जयपूर, चंडिगड, अमृतसर, वाराणसी, गोवा, हैदराबाद, केरळ येथील तिकिटांचे दर तिपटीपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.
तुलनेने दुबईवारी स्वस्त
देशांतर्गत विमान प्रवासाच्या दरात तिपटीने वाढ झाली असली, तरी त्या तुलनेमध्ये परदेशी विमान प्रवास मात्र काहीसा स्वस्त असल्याचे दिसून येते. मुंबई ते दुबई या प्रवासाची परतीच्या तिकिटासह किंमत १४ हजार ७०० रुपये इतकी आहे. तर मुंबई ते बँकॉक तिकीट परतीच्या प्रवासासह १६ ते १९ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर, मुंबई ते सिंगापूर तिकिटाची किंमत २४ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
कोलकात्याच्या तिकीट दरातही वाढ
मुंबई ते कोलकाता या तिकिटाची परतीच्या प्रवासासह किंमत २२ ऑक्टोबर रोजी १४ हजार रुपये होती. त्याची किंमत केवळ एकेरी प्रवासासाठी २० हजार रुपये झाली आहे. तर गोव्याच्या तिकिटानेदेखील १५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे दिसून येते.
परदेशी प्रवास आणखी स्वस्त होऊ शकतो...
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी काही ट्रॅव्हल कंपन्यांनी प्रमुख क्रेडिट कार्ड कंपन्यांशी करार केला आहे. विशिष्ट क्रेडिट कार्डावरून जर तिकिटाची खरेदी केली तर संबंधित प्रवाशाला तिकिटाच्या किमतीमध्ये आणखी किमान १० टक्क्यांची सूट मिळू शकते.