Join us

नाताळ आणि नवे वर्ष यामुळे हॉटेल्स ९० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने सुरू; व्यावसायिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 1:35 AM

व्यावसायिकांचा दावा : केरळ, राजस्थान, शिमला येथील हॉटेलांना अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद

मुंबई : कोरोनाच्या काळात सर्वच उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. कोरोनामुळे नागरिकांना सर्व प्रकारचे नियम पाळून घरी चार भिंतींत राहणे भाग होते. यामुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योगांचे सर्वांत मोठे नुकसान झाले. परंतु येणारे नवे वर्ष आणि नाताळ यामुळे पर्यटन व हॉटेलिंगला मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. सध्या देशातील हॉटेल्समध्ये एकूण क्षमतेच्या ९० टक्केपेक्षा अधिक ग्राहक येत असल्याचे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे (आयएचसीएल) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनीत छटवाल यांनी नमूद केले.

कोरोनाविषयक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट दिल्याने देशातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याचे प्रत्यंतर पर्यटन आणि हॉटेलिंग क्षेत्रातही दिसत आहे. पुनीत छटवाल म्हणाले, देशातील नागरिकांमध्ये विश्रांतीसाठी घराबाहेर पडण्याचा कल आता कोरोनाआधीच्या कालखंडाप्रमाणेच दिसू लागला आहे. त्यामुळेच सध्या हॉटेलमधील खोल्या ९० टक्केपेक्षा अधिक भरलेल्या दिसत आहेत.

व्यवसायातील सद्य:स्थितीची माहिती देताना छटवाल म्हणाले, नोव्हेंबरमध्ये हॉटेलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. कूर्ग, केरळ, राजस्थान, शिमला तसेच हृषीकेश या ठिकाणी हॉटेलांना अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पॅलेस आणि रिसॉर्ट यांच्या व्यवसायात सातत्य दिसत आहे.  (वृत्तसंस्था)

डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार

जानेवारीच्या अखेरीपर्यंत परदेशी पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ होईल, अशी आम्हाला खात्री आहे, असे छटवाल म्हणाले. कोरोनाच्या काळात हॉटेलिंग उद्योगाला आपले दर खूप कमी करावे लागले होते. या संकटावर मात करण्यासाठी हॉटेलिंगमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार करावा लागला आहे. हा उद्योग लवकरच निश्चितपणे पूर्वीसारखी उभारी घेईल. व्यवसायासाठीच्या प्रवासात सध्या वेगाने वाढ होताना दिसत नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विवाह सोहळ्यांमध्ये अद्यापही वेगाने वाढ होताना दिसत नाही. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसहॉटेल