Join us

संगणकांमुळे बँकांमधील नोकऱ्यांवर गदा

By admin | Published: May 04, 2017 12:58 AM

स्वयंचलित संगणकप्रणालींमुळे बँकांतील नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. अनेक कामे आता कर्मचाऱ्यांऐवजी संगणक करू लागले आहेत

 नवी दिल्ली : स्वयंचलित संगणकप्रणालींमुळे बँकांतील नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. अनेक कामे आता कर्मचाऱ्यांऐवजी संगणक करू लागले आहेत. त्यामुळे नवी नोकर भरती तर कमी झाली आहेच; पण आहे त्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही कपात होत आहे.गेल्या दोन दशकांत आयटी क्षेत्राप्रमाणे बँक क्षेत्रही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करीत आले आहे. गेल्या काही वर्षांत मात्र ही स्थिती बदलली आहे. माणसांची कामे स्वयंचलित संगणक यंत्रणा अधिक प्रभावीपणे आणि गतीने करू लागल्या आहेत. त्यामुळे बँकांतील नोकऱ्यांवर गदा आली आहे. पासबुक अपडेट करणे, रोख रक्कम जमा करणे आणि देणे, केवायसी पुष्टीकरण, वेतन जमा करणे यासारखी अनेक कामे आता संगणक करू लागले आहेत. अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसी बँक आणि एचडीएफसी बँक या मोठ्या बँकांत मोठ्या प्रमाणात स्वयंचलित यंत्रणा काम करू लागल्या आहेत. या यंत्रणांनी माणसांच्या हातातील काम हिसकावून घेतले आहे. अ‍ॅक्सिस बँकेचे रिटेल बँकिंग विभागाचे प्रमुख राजीव आनंद यांनी सांगितले की, अधिकाधिक व्यवहार डिजिटल होत आहेत. उदा. चेकबुक रिक्वेस्ट करण्यासाठी पूर्वी ग्राहकांना बँकेत येऊन एक फॉर्म द्यावा लागत होता. आता ७५ टक्के रिक्वेस्ट डिजिटली येतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)विस्तारही...गेल्या दोन तिमाहीत एचडीएफसी बँकेची कर्मचारी संख्या ६,0९६ ने कमी झाली आहे. कर्मचारी संख्येतील ही कपात ७ टक्के आहे. डिसेंबर २0१६ च्या अखेरीस बँकेत ९0,४२१ लोक काम करीत होते. मार्च २0१७ च्या अखेरीस हा आकडा ८४,३२५ वर आला आहे. विशेष म्हणजे या काळात बँकेच्या शाखा मात्र ४,५२0 वरून ४,७१५ झाल्या आहेत. एटीएमची संख्या १२ हजारांवरून १२,२६0 झाली आहे. बँकेचा विस्तार होत असताना कर्मचारी मात्र कमी झाले आहेत.