विदिशा - चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केलं, कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्यानं बहुतांश देशांनी लॉकडाऊन लागू केले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प झाले. उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांचे रोजगार गेले. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील टेली सपोर्ट इंजिनिअर हिमांशु जैन यांचीही नोकरी कोरोना संकटकाळात गेली.
नोकरी गेली तरीही हिमांशु जैन यांनी हिंमत हरली नाही. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर संधी शोधली जाऊ शकते हे दाखवून दिले. जागतिक स्तरावर कोरोनाचं संकट आल्यानंतर ३ वर्षापूर्वी एका मोठ्या कंपनीत टेली सपोर्ट इंजिनिअरपदी असणाऱ्या हिमांशु जैनची नोकरी गेली, त्यामुळे हिमांशुला पुन्हा विदिशाला परतावं लागलं. प्रतिकूल परिस्थितीत निराश होण्याऐवजी हिमांशुने असे काहीतरी करण्याचे ठरविले जे स्वतःला स्वावलंबी बनवेल आणि इतरांनाही रोजगार देईल.
हिमांशुने स्वत:ची क्षमता आणि कौशल्ये यांचा सदुपयोग केला. पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेतून त्यांनी स्वतःची टेली सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करण्यासाठी २२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतलं. तीन महिन्यांत टेली सॉफ्टवेअर कंपनीची स्थापनाही झाली आणि लॉकडाऊन कालावधीत कंपनीत आठ लोकांना रोजगारही उपलब्ध करुन दिला. याशिवाय सुमारे ५० तरुणांनाही शहरात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आता यापैकी १२ तरुण टेली अकाउंटद्वारे आपले जीवन जगत आहेत.
हिमांशुने सांगितले की, स्वत: ची कंपनी सुरु केल्यानंतर लॉकडाऊनमध्ये ती चालवणं सर्वात मोठे आव्हान होते, त्यासाठी ग्राहक हवे होते. यासाठी त्यांनी महिन्याभर वेबिनारद्वारे जिल्हाभरातील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेत, व्यापा-यांनी सांगितले की, त्यांच्या दुकानांची खाती केवळ संगणक प्रणालीद्वारे चालविली जातात. त्यांना लॉकडाऊनमुळे ती ऑपरेट करण्यात त्रास होत होता अशी अडचण सांगितली. व्यापारांची ही समस्या दूर करण्यासाठी हिमांशुने एक अशा सॉफ्टवेअरची निर्मिती केली ज्याला कुठूनही ऑपरेट करता येते. व्यापारांची गरज लक्षात घेऊन हिमांशूने एक मोबाइल अॅप विकसित केला. व्यापाऱ्यांनी याचे कौतुक केले. त्याच काळात त्यांनी जीएसटीवर आधारित सॉफ्टवेअरची निर्मितीही केली. परिणामी, लॉकडाऊन काळातही त्याचे काम सुरु राहिले.
हिमांशु यांच्यासह त्यांचे सहाय्यक कर्मचारी लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत आहेत. त्याच्या कंपनीनं आठ जणांना नोकरी दिली. सुरुवातीला कंपनीचे ग्राहक खूप कमी होते, परंतु आता ही संख्या वाढली आहे. कंपनी अकाऊटिंगपासून जीएसटी आणि इतर गणनेसाठी सॉफ्टवेअर तयार करीत आहे, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी अनलॉक १ मध्ये कंपनीच्या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे.