नवी दिल्ली : २०१९-२० या आर्थिक वर्षातील आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्याची मुदत केंद्र सरकारने वाढविली आहे. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० आणि ३१ ऑक्टोबर २०२० हून ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत वाढविण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजसंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी निर्मला सीतारामन यांनी टीडीएस रेट २५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे याचा फायदा सर्व कंपन्यांना होणार आहे. ही कपात ३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार आहे. नॉन सॅलरीड लोकांसह अन्य करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. यामुळे ५०००० कोटी रुपयांचा थेट फायदा होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
याचबरोबर, आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० आणि ३१ ऑक्टोबर २०२० हून ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. याशिवाय, पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५००० पेक्षा कमी पगार असलेल्यांचा पीएफ कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग सरकार भरत होते. आता पुढील तीन महिने १२-१२ टक्के भाग सरकारच भरणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५००० पेक्षा कमी पगार असेल्यांनाही पीएफ काढता येणार आहे. तसेच १२ टक्के कंपनी आणि १२ टक्के कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये सरकार आणखी तीन महिने पीएफ भरणार आहे. यासाठी ७२.२ लाख कर्मचाऱ्यांचा जून, जुलै, ऑगस्टचा पीएफ जमा केला जाणार आहे. यासाठी २५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.