Join us

दरकपातीमुळे सेन्सेक्स १६२ अंकांनी वाढला

By admin | Published: September 29, 2015 10:55 PM

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अनपेक्षितपणे 0.५ टक्क्यांची कपात केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजार १६१.८२ अंकांनी वाढून २५,७७८.६६ अंकांवर बंद झाला.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अनपेक्षितपणे 0.५ टक्क्यांची कपात केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजार १६१.८२ अंकांनी वाढून २५,७७८.६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४७.६0 अंकांनी अथवा 0.६१ टक्क्यांनी उसळून ७,८४३.३0 अंकांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या सुधारणेचा लाभही शेअर बाजारांना मिळाला. खरे म्हणजे सकाळी बाजारात मरगळ होती. बाजार मंदीसह उघडून २५,२८७.३३ अंकांपर्यंत खाली घसरला होता. रिझर्व्ह बँकेकडून दरकपातीची घोषणा झाल्यानंतर बाजारात तेजीचा संचार झाला होता. सेन्सेक्स ७५0 अंकांनी वाढला होता. मात्र सत्राच्या अखेरीस धातू, आरोग्य सेवा, तेल व गॅस आणि टिकाऊ ग्राहक वस्तू या क्षेत्रातील समभागांत मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे ही वाढ कमी झाली. तरीही सेन्सेक्स १६१.८२ अंकांनी अथवा 0.६३ टक्क्यांनी वाढून २५,७७८.६६ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १४ कंपन्यांचे समभाग वाढले. जागतिक पातळीवर घसरणीचा कल राहिला. चीनमधील मंदी आणि व्याजदरांबाबत अमेरिकी फेडरल रिझर्व्हची अनिश्चितता याचा फटका जागतिक बाजारास बसला. -----------सेन्सेक्समधील एचडीएफसी, मारुती सुझुकी, एमअँडएम, कोल इंडिया, एलअँडटी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, इन्फोसिस, भेल, एसबीआय, आरआयएल, ओएनजीसी, आयटीसी आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे समभाग वाढले. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई रिअल्टी सर्वाधिक १.९९ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल बँकिंग, वाहन, भांडवली वस्तू, ऊर्जा, आयटी आणि पीएसयू या निर्देशांकांत वाढ दिसून आली. वाढीचा सुसंगत कल दर्शविताना मीडकॅप निर्देशांक 0.४२ टक्क्यांनी वाढला. स्मॉलकॅप निर्देशांक मात्र 0.११ टक्क्यांनी घसरला.