मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या वाढीचा परिणाम म्हणून शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६६.१२ अंकांनी वाढून २६,२२0.९५ अंकांवर बंद झाला. चीनमधील अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचे संकेत मिळत असतानाही भारतीय बाजारांत तेजीचे वातावरण आहे. लुपीन, टीसीएस, सन फार्मा आणि इन्फोसिस यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली. मंगळवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपातीची घोषणा केली होती. कारखाना उत्पादनात घट झाल्यामुळे शेअर बाजाराच्या वाढीला लगाम लागला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २६,३४४.१९ अंकांवर तेजीने उघडला. त्यानंतर तो २६,४३१.८0 अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे मिळविलेली वाढ सेन्सेक्सने गमावली. सत्राच्या अखेरीस ६६.१२ अंकांची अथवा 0.२५ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २६,२२0.९५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा ३१ आॅगस्टनंतरचा हा सर्वोत्तम बंद ठरला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टीही सकाळी तेजीत होता. एका क्षणी तो ८,000 अंकांवर गेला होता. नफा वसुलीचा फटका बसून ही सर्व वाढ निफ्टीने गमावली. सत्राच्या अखेरीस २.00 अंकांची अथवा 0.0३ टक्क्यांची वाढ नोंदवून तो ७,९५0.९0 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी गांधी जयंतीनिमित्त सुटी असल्यामुळे बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे गुरुवार हाच या आठवड्याचा शेवटचा दिवस राहिला. या आठवड्यात सेन्सेक्स ३५७.४५ अंकांनी, तर निफ्टी ८२.४0 अंकांनी वाढला.
दरकपातीमुळे सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी तेजीत
By admin | Published: October 01, 2015 10:18 PM