Join us

सणासुदीमुळे वाहन बाजारात तेजी

By admin | Published: November 10, 2015 10:34 PM

सणासुदीमुळे मागणी वाढल्याने वाहन बाजार तेजीने तळपत असून कार विक्रीचा गीअर सलग बाराव्या महिन्यातही टॉपवर आहे.

नवी दिल्ली : सणासुदीमुळे मागणी वाढल्याने वाहन बाजार तेजीने तळपत असून कार विक्रीचा गीअर सलग बाराव्या महिन्यातही टॉपवर आहे. आॅक्टोबर २०१५ मध्ये कार विक्रीत २१.६ टक्के वाढ झाली आहे. मोटारसायकल, स्कूटरसोबत व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही या अवधीत लक्षणीय वाढ झाली आहे.सोसायटी आॅफ आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (सियाम) आकडेवारीनुसार आॅक्टोबर २०१५ मध्ये भारतीय बाजारात १,९४,१५८ कार विकल्या गेल्या. आॅक्टोबर २०१४ मध्ये १,५९,४०८ कार विकल्या गेल्या होत्या. सियामचे महासंचालक विष्णू माथुर यांनी सांगितले की, सणासुदीमुळे वाहन उद्योगात उत्साहाचे वातावरण आहे. आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रत्येक श्रेणीच्या वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ झाली. आॅक्टोबर महिन्यातील काही आकडेवारी अजून यायची आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार यंदा सणासुदीचा हंगाम मागच्या वर्षाच्या तुलनेत चांगला राहील, असे वाटते. मारुती सुझुकी इंडियाची भारतीय बाजारातील विक्री २१.५४ टक्क्यांनी वाढली असून, या अवधीत या कंपनीची ९७,९५१ वाहने विकली गेली. या कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीतही २४.७२ टक्के वाढ झाली असून या अवधीत १,२१,०६३ प्रवासी वाहने विकली आहेत. यात अर्टिगा आणि एस-क्रॉस या नवीन मॉडेलचे लक्षणीय योगदान राहिले. ह्युंदाई मोटर इंडियाच्या विक्रीतही ४.७८ टक्के वाढ होऊन या कंपनीच्या ३९,७०९ कार विकल्या गेल्या. मागच्या वर्षी याच अवधीत या कंपनीची ३७,८९४ वाहने विकली गेली होती. होंडा कार्स इंडियाच्या १९,३१० कार विकल्या गेल्या, असे सियामने म्हटले आहे. टाटा मोटर्सच्या वाहनांच्या विक्रीत १५.१६ टक्के वाढ झाली असून या अवधीत कंपनीच्या ११,०४९ कार विकल्या गेल्या. महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत १९.१० टक्के वाढ झाली आहे. आणखी काही दिवस तेजीचा हा सिलसिला सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.