लंडन : सॅप सॉफ्टवेअर हॅक झाल्यामुळे या सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या ५० हजार कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सॅप ही जर्मन कंपनी असून, तिने हे सॉफ्टवेअर बनविले आहे. सॅपने म्हटले की, सॉफ्टवेअरची सुरक्षा सेटिंग कशा प्रकारे संघटित असावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आम्ही २००९ आणि २०१३ मध्ये जारी केल्या होत्या. तथापि, ओनॅप्सिसने एकत्रित केलेल्या डाटातून असे दिसून आले आहे की, प्रदूषित झालेल्या ९० टक्के सॅप यंत्रणा योग्य प्रकारे सुरक्षित नव्हत्या.
सॅप आणि ओरॅकल यासारख्या सॉफ्टवेअर प्रणालीसाठी सुरक्षा अॅप्लिकेशन्स बनविणाºया ओनॅप्सिसचे मुख्य कार्यकारी मॅरियानो नुनेझ यांनी सांगितले की, सॉफ्टवेअर हॅक करून अवघ्या एका सेकंदात एखादी कंपनी ठप्प केली जाऊ शकते. हॅकिंगद्वारे सॅप यंत्रणेतून कोणतीही माहिती चोरली जाऊ शकते. माहितीत सुधारणा केली जाऊ शकते. म्हणजेच हॅकर वित्तीय घोटाळा करू शकतात. खात्यावरील पैसे काढून घेऊ शकतात. केवळ घातपात करणे आणि यंत्रणा विस्कळीत करणे यासारखे उपद्व्यापही करू शकतात. सॅपने म्हटले की, सॉफ्टवेअरच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कवच इन्स्टॉल करण्याची शिफारस सॅप नेहमीच करीत आली आहे. सुरक्षा कवच उपलब्धही करून दिले गेले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, जगातील बलाढ्य २ हजार कंपन्यांपैकी ९० टक्के कंपन्या सॅप सॉफ्टवेअर वापरतात. कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या नोंदी ठेवण्यापासून उत्पादनांचे वितरण आणि औद्योगिक प्रक्रिया अशी सर्व प्रकारची कामे सॅपवरच होतात. जगातील ७८ टक्के खाद्य कंपन्या वितरणासाठी सॅपचा वापर करतात. ८२ टक्के वैद्यकीय उपकरणांचे वितरणही सॅपवरूनच होते.