Join us

नवीन आवक वाढल्याने करडी तेलात मंदी

By admin | Published: May 19, 2014 3:54 AM

मागील आठवड्यात नवीन करडी बीची आवक वाढली.

 मागील आठवड्यात नवीन करडी बीची आवक वाढली. त्यात उठाव कमी असल्याने करडी तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी घसरले. मात्र, खोबरेल तेलाचे भाव गगनाला जाऊन भिडले असून १९० रुपये प्रतिलिटर हा आजपर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. मागणी वाढल्याने उडीद डाळ, मठडाळीच्या भाव वधारले, तर वार्षिक धान्य खरेदी करणारी ग्राहकी संपुष्टात आल्याने गहू, तांदूळ, ज्वारी, मिरचीचे भाव स्थिर राहिले. मागील आठवडा लोकसभा निवडणुकीने गाजविला. सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. देशात एकाच पक्षाला बहुमत मिळाल्याने पुढील पाच वर्षे स्थिर सरकार राहणार. यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. नवीन सरकारकडून उद्योग व व्यापारी जगताच्या आशा वाढल्या आहेत. आठवडाभर उलाढाल कमीच राहिली. त्यातही शुक्रवारी मतमोजणीच्या दिवशी तर ग्राहकांनी बाजारपेठेकडे संपूर्ण पाठ फिरवली होती. शनिवारी उलाढाल वाढली होती. नवीन करडीची आवक दरवर्षी होळीनंतर बाजारात नवीन करडी बीची आवक होत असते. मात्र, यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. यात नवीन करडी बीचे आगमन लांबणीवर पडले. तब्बल दीड महिना यंदा उशिराने करडी बी बाजारात आली. महाराष्ट्रातील बुलढाणा, मेहकर, चिखली तसेच आंध प्रदेशातून करडी बीची आवक होत आहे. जालना, मानवत, परतूर, सोलापूर व कर्नाटक येथील लोखंडी (लोटरी) घाण्यावर करडी बी पासून खाद्यतेल तयार केले जात आहे. नवीन करडी बीची आवक वाढल्याने भाव २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली उतरले. परिणामी, करडी तेलाचे भाव १ हजार रुपयांनी उतरून ८५०० रुपये प्रतिक्विंटल विकल्या जात आहे. किरकोळ विक्रीत १० रुपयांनी भाव कमी होऊन ८५ ते ९० रुपये प्रतिलिटरने करडी तेल विकले जात आहे. जानेवारी महिन्यात करडी तेल १२० ते १३० रुपये प्रतिलिटरने विक्री झाले होते. आजपर्यंतचा हा उच्चांकी भाव ठरला. मात्र, मागील ४ महिन्यांत करडी तेल लिटरमागे ४० ते ४५ रुपयांनी स्वस्त झाले. शेंगदाणातेल ८५ ते ९० रुपये प्रतिलिटर विकल्या जात आहे. सध्या करडी तेल व शेंगदाणा तेलाचे भाव सारखेच आहेत. सोयाबीन तेल ७५ रुपये, सरकी रिफार्इंड व पामतेल ७० रुपये प्रतिलिटर विकल्या जात आहे. खाद्यतेलाचे विक्रेते जगन्नाथ बसैये बंधूने सांगितले की, करडी तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी कमी होणार असा अंदाज आम्ही एप्रिल महिन्यात वर्तविला होता तो तंतोतंत खरा ठरला आहे. करडी तेलाच्या भावाने मागील आठ महिन्यांतील नीचांक गाठला आहे. एकीकडे नवीन करडीची आवक वाढत आहे. मात्र, खाद्यतेलास उठाव नाही. पुढे खाद्यतेलात भाववाढीची शक्यता कमीच आहे. खोबरेल तेल कडाडले खोबरेल तेलाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. मागील महिन्यात १६० ते १७० रुपये प्रतिलिटरने विक्री झाले आणि अचानक खोबरेल तेल चर्चेत आले. कारण, मागील वर्षी याच महिन्यात १२० ते १३० रुपयांपर्यंत खोबरेल तेल विकले जात असे. मागील पंधरवड्यात तेजीत आणखी २० रुपयांची भर पडून शनिवारी तब्बल १९० रुपये प्रतिलिटर खोबरेल तेल विक्री झाले. सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. कच्च्या खोबराचे यंदा उत्पादन कमी असल्याचे कारण, पुढे करीत खोबरेल तेलाचे भाव वाढविण्यात आले, असा आरोप केला जात आहे. उडीद, मठडाळीत भाववाढ मागील आठवड्यात मठडाळ क्विंटलमागे ४०० रुपयांनी, तर उडीदडाळ ६०० रुपयांनी वधारली. मठडाळ ७३०० ते ७७०० रुपये, तर उडीद डाळ ६००० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात उडीदचे भाव वाढल्यानेही तेजी आल्याचे कारण व्यापारी सांगत आहेत, तर राजस्थानमधून मठाची आवक होते. राजस्थानमधील होलसेल व्यापार्‍यांनी सांगितले की, राजस्थानात जेवढे मठ उत्पादन होते त्यापैकी ६० ते ७० टक्के मठ एकट्या महाराष्ट्रात विकली जाते. मागील आठवड्यात मठ ३०० रुपयांनी महागून ५८०० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. बाकीच्या डाळीचे भाव स्थिर होते.