कोरोनास्थितीतून सावरत असलेल्या जागतिक बाजारपेठेला आता ओमायक्रॉनच्या भीतीने ग्रासले आहे. ओमायक्रॉनचा फैलाव जसजसा वाढू लागला आहे तसतशी जागतिक बाजारपेठ आक्रसत चालल्याचे निदर्शनास येत आहे. तेलाचे भावही कमी कमी होत चालले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटत असल्याने देशांतर्गत किमतीही घटण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किमती सध्या किती?नोव्हेंबरच्या सुरुवातीला कच्च्या तेलाची किंमत ८४ डॉलर प्रति बॅरल एवढी होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कच्चे तेल अवघे ४३ डॉलर प्रति बॅरल असे होते. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वृत्तानंतर गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत ७० डॉलर प्रति बॅरल एवढी खाली आली आहे. विद्यमान कोरोनाप्रतिबंधक लसी ओमायक्रॉनवर पुरेशा परिणामकारक ठरणार नसल्याची चर्चा असल्याने त्याचाही परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर जाणवत आहे.
राखीव साठा वापरण्याने काय होईल?अमेरिकेसह भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी त्यांच्याकडील तेलाचे राखीव साठे खुले करण्याचा इरादा जाहीर केला. तेलाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता ओमायक्रॉनच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरणीला लागल्या आहेत.
का कमी होऊ शकतील किमती?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या की त्यानुसार देशांतर्गत इंधनाच्या किमती कमी-जास्त होत असतात. त्यामुळे आताही तेल उत्पादक कंपन्या इंधनाच्या किमती स्थिर ठेवतात की कमी करतात, याकडे लक्ष ठेवणे गरजेेचे आहे. ओमायक्रॉनमुळे घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल, डिझेलच्या देशांतर्गत किमतीही कमी होतील, अशी अपेक्षा आहे.