Join us

चीनमधील मंदीच्या भीतीने बाजार कुडकुडला

By admin | Published: January 25, 2016 2:11 AM

जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमी होण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेला अंदाज, चीनच्या आर्थिक वृद्धीचा घसरलेला दर, जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या

जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमी होण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेला अंदाज, चीनच्या आर्थिक वृद्धीचा घसरलेला दर, जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या कोसळणाऱ्या किमती आणि जागतिक मंदीचे पुन्हा एकदा दाटलेले मळभ यामुळे गतसप्ताहात भारतीय बाजार खाली आले. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बाजार वाढून जवळपास सगळी घट भरून निघाली असली तरी सलग तिसऱ्या सप्ताहात निर्देशांक लाल रंगात बंद झाले.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात अस्वलाचाच सर्वत्र संचार दिसून आला. पाच पैकी तीन दिवस निर्देशांक खाली आला. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर तेजी आल्याने निर्देशांक वाढले. त्यामुळे सप्ताहातील बरीचशी घसरण भरुन निघाली. मात्र सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टी अनुक्रमे १९.३८ आणि १५.३५ अंशांनी खालीच राहिले.सप्ताहाचे बंद निर्देशांक अनुक्रमे २४४३५.६६ आणि ७४२२.४५ राहिले. सलग तिसऱ्या सप्ताहात बाजार खाली आला आहे.याचदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर कमी होण्याची शक्यता जाहीर केल्याने बाजारात खळबळ निर्माण झाली. हा वृद्धीदर ३.४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर मात्र ७.३ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.दरम्यानच्या काळात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारपेठेत विक्रीचा जोर वाढविला आहे. या संस्थांनी ६४७९.०८ कोटी रुपयांची समभाग विक्री केली.डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरतच आहे. गतसप्ताहात डॉलरच्या तुलनेत रुपया ६८ रुपयांपर्यंत खाली गेला. सलग तेराव्या महिन्यात देशाची निर्यात घसरली आहे. जगभरातील मंदीच्या वातावरणाचा हा परिणाम आहे. त्याचबरोबर आयातही कमी झाली आहे. यामुळेही बाजार खालीआला.दरम्यान युरोपच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही पावले उचलली जाणार आहेत. युरोपियन सेंट्रल बॅँकेच्या अध्यक्षांनी युरोपला आर्थिक पॅकेज दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेचा जगभरातील बाजारांवर अनुकूल परिणाम झाला. परिणामी सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढला.