Join us  

Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 9:18 AM

Iran Israel Crude Oil: इराण आणि इस्रायलमध्ये अखेर संघर्षाचा भडका उडाला. इराणने इस्रायलवर तब्बल १८० मिसाईल डागल्या. त्यामुळे तणाव वाढला असून, याचा थेट परिणाम क्रूड ऑईल अर्थात कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाले आहेत. 

Crude Oil News: युक्रेन आणि रशिया युद्धानंतर आता इस्रायल आणि इराण संघर्षाने जगाची चिंता वाढवली आहे. जगभरातील बाजारांवर या संघर्षाचा परिणाम झाला असून, पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या आशाही भंगल्या आहेत. इराणनेइस्रायलवर झटपड १८० क्षेपणास्त्र डागली आणि प्रत्युत्तर दिले. त्यामुळे तणाव वाढला असून, याचा सर्वात आधी परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. क्रूड ऑईलचे दर झटक्यात वाढले आहेत. (crude oil price increase reason)

इराणने इस्रायलवर केला हल्ला

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेला संघर्ष वाढला आहे. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, "इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत. आता आम्ही इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार आहोत. आमची रणनीती तयार आहे. पण, वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू", असा इशारा इस्रायलने इराणला दिला आहे. 

मंगळवारी रात्री इराणने इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलची राजधानी तेल अवीव जवळील जाफामध्ये गोळीबाराची घटना घडली. ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.  

कच्चे तेल क्षेत्रात इराण महत्त्वाचा वाटा

इराण ओपेकचा सदस्य आहे आणि कच्चे तेल उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये महत्त्वाचा देश आहे. जगभरात होणाऱ्या तेल पुरवठ्यापैकी एक तृतीयांश तेल इराण पुरवतो. इराण आणि इस्रायल संघर्षामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होताना दिसत असून, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. 

कच्च्या तेलाच्या किंमती ५ टक्क्यांनी वाढल्या

इराण आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट क्रूड किंमती प्रति बॅरल पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी किंमती २.७ टक्क्यांनी घसरल्या होत्या. 

आता किंमती वाढल्याने कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७१ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूडबद्दल सांगायचं झालं तर ५ टक्क्यांनी वाढून किंमती ७५ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. 

शेअर मार्केटवरही परिणाम

इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम फक्त क्रूड ऑईलवरच नाही, तर जगभरातील शेअर मार्केटवरही होण्याची शक्यता दिसत आहे. S&P-500 मध्ये 1.4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तर Dow Jones आणि NasDaq मार्केटही लाल झाले आहे. जपानमधील निक्केई बाजारही 1.77 अंकांनी घसरला आहे. 

भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे परिणाम भारतातही होऊ शकतात. कच्चे तेल महागल्याने तेल वितरक कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराण इस्रायल संघर्षामुळे भारतीयांना आर्थिक झळ बसू शकते.

टॅग्स :खनिज तेलइराणइस्रायलतेल शुद्धिकरण प्रकल्पशेअर बाजारशेअर बाजार