Join us

वृद्धीच्या चिंतेमुळे सेन्सेक्स घसरला

By admin | Published: September 21, 2015 11:04 PM

जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला

मुंबई : जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६ अंकांनी घसरून २६,१९२.९८ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांतील चांगल्या कामगिरीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिले. त्याचा फटका सेन्सेक्सला बसला, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. मुंबई शेअर बाजारात सकाळी मोठी घसरण दिसून आली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २६ हजार अंकांच्या खाली आला होता. २५0 पेक्षाही जास्त अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २५,९७२.५४ अंकांपर्यंत खाली उतरला होता. दुपारच्या सत्रात मात्र बाजारात खरेदीची गती वाढली. त्यामुळे प्रारंभीची घसरण बाजाराने भरून काढली. सत्राच्या अखेरीस २५.९३ अंकांची अथवा 0.१0 टक्क्यांची अल्प घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,१९२.९८ अंकांवर बंद झाला. आदल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ५१२.९८ अंकांची वाढ नोंदविली होती. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरांविषयीचा निर्णय स्थगित ठेवल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे बाजारात तेजी आलीहोती.५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४.८0 अंकांनी अथवा 0.0६ टक्क्यांनी घसरून ७,९७७.१0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो खाली-वर होताना दिसून आला.रिलायन्स इंडस्ट्रीजला घसरणीचा सर्वाधिक १.९४ टक्क्यांचा फटका बसला. त्याखालोखाल एमअँडएम, आयटीसी, भारती एअरटेल आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांचे समभाग घसरले. घसरणीच्या धामधुमीत काही कंपन्यांचे समभाग मात्र वाढले. मारुती सुझुकीचा समभाग सर्वाधिक २.६४ टक्क्यांनी वाढला. मारुतीच्या गुजरातमधील प्रकल्पास गुजरात सरकारकडून लवकरच हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर कंपनीचा समभाग वाढला. याशिवाय हिंदाल्को, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, गेल आणि टाटा मोटर्स यांचे समभागही वाढले. जागतिक बाजारांपैकी आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. हाँगकाँगचा हेंग सेंग 0.७५ टक्क्यांनी घसरला. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र १.८९ टक्क्यांनी वर चढला. युरोपीय बाजारात सकाळी अल्प तेजी दिसून आली. गेल्या दोन आठवड्यांतील घसरणीतून युरोपीय बाजार बाहेर पडत असल्याचे दृश्य सकाळी दिसले.(वृत्तसंस्था)