ड्युलक्स पेंट (Dulux Paint) तयार करणारी कंपनी अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडचे (Akzo Nobel India Limited) शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कंपनीचे शेअर्स १५.५५ टक्क्यांनी वधारून बंद झाले. त्यानंतर शुक्रवारीही मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान त्यात अधिक तेजी दिसून आली.
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे प्रवर्तक आपला हिस्सा विकणार आहेत. १ ऑक्टोबरला शेअर बाजाराला माहिती देण्यात आली असून त्यात प्रमोटर्स Akzo Nobel NV कडून ४ ऑक्टोबर २०२४ ला एक लेटर मिळाल्याचं म्हटलं. यामध्ये पोर्टफोलिओ रिव्हू बद्दल सांगण्यात आलं असून प्रमोटर्सचा फोकस साऊथ एशियावर असल्याचं म्हटलंय. दरम्यान कंपनीनं यावर कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. रिपोर्टनुसार, जेएसडब्ल्यू ग्रुप, अदानी ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप आणि एशियन पेंट्स लिमिटेडची या कंपनीवर नजर आहे.
शेअरमध्ये तेजी
शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. बीएसईमध्ये शुक्रवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ४४४४ रुपयांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर कंपनीचा शेअर ५.२१ टक्क्यांनी वधारून ४,६२२.७५ रुपयांवर पोहोचला.
युरोपमधील सर्वात मोठी पेंट उत्पादक आणि ड्युलक्सची मालक अक्झोनोबेल एनव्ही भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीचे प्रवर्तक अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडमधील आपला हिस्सा विकत आहेत. लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, डच कंपनी कॅश डील करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रवर्तक अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडचं मूल्य २.५ अब्ज डॉलर ते ३ अब्ज डॉलर्स ठेवत आहेत.
अदानी, जेएसडब्ल्यूसह अनेकांच्या नजरा
कंपनीचे प्रवर्तक सध्याच्या बाजारमूल्याच्या ५० टक्के प्रीमियमची मागणी करत आहेत. त्याचबरोबर या कंपनीत इच्छुक असलेले खरेदीदार २५ ते ४० टक्के प्रीमियम भरण्यास तयार आहेत. Akzo Nobel India Limited विकत घेण्यासाठी जेएसडब्ल्यू समूह, अदानी समूह, आदित्य बिर्ला समूह आणि एशियन पेंट्स या कंपन्या शर्यतीत आहेत.
१९५४ मध्ये स्थापन झालेली कंपनी
अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडची स्थापना १९५४ मध्ये झाली. तेव्हा कंपनीचं नाव इंडियन एक्सप्लोसिव्ह लिमिटेड असं होतं. ही कंपनी भारत सरकारच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आली होती. १९८५ मध्ये कंपनीचं नाव बदलून आयईएल करण्यात आले. १९८९ मध्ये कंपनीचं नाव पुन्हा बदलण्यात आलं. आता नवीन नाव आयसीआय इंडिया होतं. २००३ मध्ये जेव्हा सरकारनं आपला हिस्सा विकला तेव्हा पुन्हा एकदा कंपनीचं नाव बदलण्यात आलं. यावेळी कंपनीचं नाव अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड असं ठेवण्यात आलं.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)