अविनाश कोळी
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कायम असताना उत्पादनात झालेली घट, उत्पादन खर्चात होत असलेली वाढ यामुळे स्टीलच्या दरात ३४ टक्के वाढ झाली आहे. भारतातीलइंधन दरवाढीचाही फटका स्टीलच्या दराला बसला आहे.
स्टीलच्या वाढत्या दरामुळे बांधकाम क्षेत्रासह विविध उद्योगांच्या बजेटला दणका बसला आहे. स्टील उत्पादन करताना बऱ्याच यंत्रांसाठी डिझेलचा वापर होत होता. उत्पादित व कच्च्या मालाच्या वाहतुकीलाही इंधन लागते. त्यामुळे इंधन दरवाढीचा सर्वच बाजूंनी स्टीलच्या दराला फटका बसला आहे. उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे स्टीलच्या दरवाढीत इंधन दरवाढीने मोठी भर टाकली आहे.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टीलचा वापर वाढला असला तरी उत्पादन घटले आहे. चीनमध्ये सध्या ७० टक्के क्षमतेने स्टील उद्योग सुरू आहेत. इंडियन स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार, चीनमधील स्टीलचा वापर यावर्षीच्या तिमाहीत ४७ टक्क्यांनी वाढला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीही चीनने उत्पादनात घट करण्यास सुरुवात केली आहे. जपानमध्येही १५.९ टक्के उत्पादन घटले आहे.
भारतात मागील आर्थिक वर्षात १०२ दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन झाले होते. यावर्षी ते ९४ दशलक्ष टनापर्यंत म्हणजेच ७.८ टक्क्यांनी घटण्याची चिन्हे आहेत. निर्यातीत वाढ झाली असून, आयातीत २९.८ टक्के घट दिसत आहे. दुसरीकडे भारतातील वापर व तुलनेने मागणी कायम आहे. त्यामुळे दरवाढ कायम आहे.
अशी झाली दरात वाढ
मार्चपूर्वी स्टेनलेस स्टीलचा दर सरासरी २०० ते २०५ रुपये प्रतिकिलो होता. तो आता २३५ रुपयांवर गेला आहे. एमएस (माईल्ड स्टील)चा दर मार्चपूर्वी सरासरी ६५ ते ६६ रुपये किलो होता. आता तो सरासरी ८५ ते ९० रुपये किलो इतका झाला आहे. बांधकामासाठीच्या स्टीलचा किरकोळ बाजारातील दर ४० रुपये किलोवरून ६० रुपयांपर्यंत गेला आहे.