गेल्या काही काळापासून एडटेक फर्म (Edtech Firm) बायजूस (Byju's) मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीचे प्रमुख बायजू रवींद्रन यांनी आपलं घरही गहाण ठेवल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. आता एडटेक स्टार्टअप बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्डानं विद्यमान गुंतवणूकदारांकडून २० कोटी डॉलर्स उभारण्यासाठी राईट्स इश्यूला मंजुरी दिली. बायजूसचे राइट्स इश्यू २९ जानेवारी रोजी लॉन्च करण्यात आला होता आणि तो पुढील ३० दिवसांसाठी वैध असेल. हे व्हॅल्युएशन, स्टार्टअपच्या त्या अखेरच्या फंडिंग राऊंडपेक्षा ९९ टक्क्यांनी कमी आहे, जे २२ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर झालं होतं.
स्टार्टअपचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्यासह बहुतेक विद्यमान गुंतवणूकदारांनी राईट्स इश्यूत भाग घ्यावा अशी बायजूस अपेक्षा आहे, असं या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचं म्हणणं आहे. सर्व विद्यमान गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतील यादृष्टीनं इश्यूसाठी सबस्क्रिप्शन किंमत किमान ठेवण्यात आली आहे. सध्याच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एखाद्या कंपनीच्या वाजवी बाजार मूल्यांकनापेक्षा राइट्स इश्यू अंतर्गत किंमत सहसा खूपच कमी असते. बायजू रवींद्रन यांनी भागधारकांना पत्र पाठवून राइट्स इश्यूमधून पैसे उभारण्याच्या बोर्डाच्या निर्णयाची माहिती दिली.
संचालक मंडळात बदल?
एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, Byju's आर्थिक वर्ष २०२३ चं ऑडिट पूर्ण केल्यानंतर बोर्डाची पुनर्रचना करण्याचा विचार करत आहे. स्टार्टअपच्या बोर्डात सध्या बायजू रवींद्रन, त्यांची पत्नी आणि सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ आणि त्यांचा भाऊ रिजू रवींद्रन यांचा समावेश आहे. रवींद्रन यांनी पत्रात म्हटलंय की, 'आम्हाला विश्वास आहे की निधी उभारणीमुळे कंपनीला पुनर्बांधणी आणि विस्तारासाठी आवश्यक संसाधनं उपलब्ध होतील. या निधीचा वापर व्यवसाय ऑपरेशन्स सुरू ठेवण्यासाठी, दायित्वांचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि कंपनीला सस्टेनेबल बनवण्यासाठी केला जाणार आहे.’
रोखीचं मोठं संकट
राइट्स इश्यू अशा वेळी आला आहे जेव्हा स्टार्टअपला रोख रकमेचा मोठा तुटवडा सहन करावा लागत आहे. हजारो कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी बायजू रवींद्रन यांनी आपलं घर गहाण ठेवल्याचं बोललं जात आहे. थकबाकी न भरल्याबद्दल लेंडर्स आणि वेंडर्स यांनी बायजू यांना दिवाळखोरीच्या नियमांतर्गत न्यायालयात खेचलं आहे.
पर्सनल फंडातून १.१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
पत्रात, रवींद्रन यांनी अशीही माहिती उघड केलीये की संस्थापकांनी गेल्या १८ महिन्यांत त्यांच्या वैयक्तिक निधीतून कंपनीमध्ये १.१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आम्ही कंपनीसाठी खूप मोठा वैयक्तिक त्याग केला आहे. या कंपनीच्या उभारणीसाठी आम्ही आमचं जीवन समर्पित केलंय आणि आम्ही तिच्या ध्येयावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आमचा उत्साह कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं.