Join us  

ऐन सणासुदीत ड्रायफ्रूट होणार कडू; काजू, बदाम, अक्रोडचे भाव वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 5:28 AM

काजू, बदाम, मनुके आणि अक्रोड यासारख्या सर्वच सुक्या मेव्यांच्या किमती वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ८३.७८ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेल्याने सुक्या मेव्यांच्या (ड्रायफ्रूट) भावात मोठी वाढ झाली. परिणामी, सणासुदीच्या काळात नागरिकांचा खिसा रिकामा होईल. डॉलर मजबूत झाल्यामुळे आयात वस्तूंची भाववाढ झाली आहे. त्यात सुक्या मेव्यांचा समावेश आहे. 

काजू, बदाम, मनुके आणि अक्रोड यासारख्या सर्वच सुक्या मेव्यांच्या किमती वाढल्या आहेत. सणासुदीच्या काळात मिठायांसाठी सुक्या मेव्यांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. त्यामुळे भाव तसेही तेजीत असतात. त्यातच डॉलरच्या तुनलेत रुपया कमजोर झाल्याने आयात खर्च वाढला आहे. परिणामी, सुक्याचे भाव आणखी तेजीत आले आहेत. 

तुकडा काजूची मागणी वाढलीnबाजारातील सूत्रांनी सांगितले की, मागील २० दिवसांत काजू आणि बदाम यांची मागणी वाढली आहे. विशेषत: ४ तुकडे काजूची मागणीत वाढ झाली आहे. nया काजूंचा वापर प्रामुख्याने मिठायांत होतो. सणासुदीच्या हंगामाची सुरुवात लक्षात घेऊन मोठ्या कंपन्यांनी मिठायांची खरेदी सुरू केली आहे. 

पुरवठ्यात अडथळे : व्यावसायिकांनी सांगितले की, डॉलरच्या मजबुतीबरोबरच सुक्या मेव्यांच्या पुरवठ्यातील अडथळे हेही एक कारण किमती वाढण्यामागे आहे. दिल्लीतील सुक्या मेव्यांचा घाऊक बाजार ‘खारी बावली’मध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण, दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांतून सुक्या मेव्यांचा पुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून पुरवठा विस्कळीत झाला आहे.