Join us

अर्धवर्षाच्या अखेरीस बाजारावर निराशेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:18 AM

भारतीय अर्थव्यवस्थेचा घसरलेला वृद्धिदर, सरकारतर्फे केला जाणारा जादाचा खर्च, यामुळे वित्तीय तूट वाढण्याची व्यक्त होत असलेली भीती, पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे उद्योगांपुढे निर्माण झालेली समस्या

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीभारतीय अर्थव्यवस्थेचा घसरलेला वृद्धिदर, सरकारतर्फे केला जाणारा जादाचा खर्च, यामुळे वित्तीय तूट वाढण्याची व्यक्त होत असलेली भीती, पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे उद्योगांपुढे निर्माण झालेली समस्या, रुपयाची घसरती किंमत आणि परकीय वित्तसंस्थांकडून सातत्यपूर्ण विक्री, यामुळे अर्धवर्षाच्या अखेरीस शेअर बाजारावर निराशेचे ढग दाटून आलेले दिसतात. यामुळे सप्ताहामध्ये बाजार पुन्हा खाली आला.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह निराशेचाच दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस काही प्रमाणात झालेल्या खरेदीमुळे संवेदनशील निर्देशांक काहीसा वाढला असला, तरी सप्ताहाचा विचार करता त्यामध्ये घटच झाली आहे. सप्ताहामध्ये हा निर्देशांक ६३८.७२ अंशांनी खाली येऊन ३१२८३.७२ अंशांवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १७५.८० अंशांनी म्हणजेच १.५ टक्क्यांनी खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस तो ९७८८.६० अंशांवर बंद झाला. विक्रीच्या माºयामुळे निर्देशांक खाली आल्याने, तो ९८०० अंशांची पातळी मात्र राखू शकला नाही.बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही खाली आलेले दिसून आले. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये अनुक्रमे २६५.५७ आणि २८५.४९ अंशांची घट झाली. मिडकॅप निर्देशांक १५३४४.३२ अंशांवर, तर स्मॉलकॅप निर्देशांक १५९७५ अंशांवर बंद झाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ कमी प्रमाणात होत आहे. त्यातच सरकारच्या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसू लागली आहे. याचा फटका वित्तीय तुटीमध्ये वाढ होण्याने बसू शकतो. त्यातच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने, उद्योगांच्या नफ्यावरही परिणाम संभवतो. या जोडीलाच भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत घसरताना दिसत आहे. यामुळेच परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारामध्ये विक्री कायम राखली आहे. या संस्था नफा कमविण्यासाठी विक्री करीत असल्याचे सांगितले जात असले, तरी ते तितकेसे खरे नाही.

टॅग्स :निर्देशांक