नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपन्या येत्या फेस्टिव्हल सीजनमध्ये आपली विक्री वाढविण्यासाठी बंपर नोकर भरती करणार आहेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या अनेक ई-कॉमर्स कंपन्या देशातील जवळपास ३ लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत. RedSeer च्या अहवालानुसार, फेस्टिव्ह सीजन पाहता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे बहुतेक नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात केल्या जातील. एवढेच नव्हे तर ई-कॉमर्स कंपन्यांकडून वस्तू वितरित करणार्या लॉजिस्टिक कंपनी ईकॉम एक्स्प्रेसनेही ३० हजार नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कंपन्यांमध्ये नोकर भरती अपेक्षित आहे.
२० टक्के कामगारांची कपात नाही RedSeer च्या म्हणण्यानुसार, फेस्टिव्ह सीजन संपल्यानंतर तात्पुरत्या कामगारांपैकी २० टक्के कामगारांची कपात केली जाणार नाही. अलिकडच्या काळात लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारतात एक लाख लोकांची भरती करणार आहे. नवीन कर्मचारी ऑर्डर पॅकिंग, शिपिंग किंवा क्रमवारी लावण्यात मदत करतील. या कामरागांची नियुक्ती अर्धवेळ व पूर्णवेळ तत्त्वावर केली जाणार आहे.
याचबरोबर, अहवालात म्हटले आहे की, अंदाजे ३ लाख नोकऱ्यांपैकी ७० टक्के या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे देण्यात येतील अशी अपेक्षा आहे, तर उर्वरित ईकॉम एक्स्प्रेस इत्यादी लॉजिस्टिक कंपन्या देतील. या नोकऱ्यांपैकी ६० टक्के लॉजिस्टिक्स कार्यात असल्याचा अंदाज आहे. उर्वरितपैकी २० टक्के वेअर हॉसिंग म्हणजेच गोदामात आणि २० टक्के ग्राहक सेवा कार्यात असू शकतात.
Flipkart मध्ये अशी असणार भरतीमहिन्याच्या सुरूवातीला फ्लिपकार्टने म्हटले होते की, या फेस्टिव्हल सीजनमध्ये ७०,००० लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नोकरी मिळण्यास मदत होईल. फ्लिपकार्टमध्ये थेट नोकर्या पुरवठा साखळी विभागात (supply chain department) देण्यात येतील. त्याअंतर्गत कंपनी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि शॉटर्सची भरती करणार आहे. याशिवाय, कंपनी फ्लिपकार्टच्या सेलर पार्टनर लोकेशन आणि किराणा दुकानांमध्ये अप्रत्यक्षरित्या लोकांना नोकरी देईल.