मुंबई : अधिकाधिक ग्राहकांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून भांडवली बाजारात यावे, याकरिता म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपली प्रक्रिया अधिक गतीमान करण्याच्या दृष्टीने ‘ई-केवायसी’ प्रक्रियेचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. तूर्तास ही सुविधा नव्याने म्युच्युअल फंड क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांना देण्यात येणार आहे. म्युच्युअल फंड आणि एकूणच भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची सर्व माहिती कंपन्यांकडे असावी, याकरिता केवासीची प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला त्याचे सर्व पुरावे कंपन्यांना सादर करावे लागतात. यानंतर कंपन्यांनी देखील त्याची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की, संबंधित गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्याची मुभा देण्यात येते. मात्र, सध्या फॉर्म भरून आणि कागदपत्र सादर करून व त्याची पडताळणी करून केवायसी अर्थात नो युअर कस्टमरची प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो. परंतु, ई-केवायसी पद्धतीमुळे हे प्रक्रिया कमाल एक आठवड्याच्या आत पूर्ण होणार आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील प्रत्यक्ष गुंतवणूक, विमा, युलिप यांसाठी केवायसी निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांचे ‘ई-केवायसी’
By admin | Published: October 18, 2015 11:01 PM