नवी दिल्ली : एअरटेलला आधार ई-केवायसी सुविधा वापरण्याची परवानगी आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय) दिली आहे. एअरटेल पेमेंट बँकेवरील ई-केवायसीचे निर्बंध मात्र कायम राहणार आहेत.
एकूण २८२ दशलक्ष ग्राहकांसह देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने आधार ई-केवायसीचा गैरवापर करून ग्राहकांचे स्वयंपाकाच्या गॅसच्या सबसिडीचे पैसे परस्पर एअरटेल पेमेंट बँकेत वळविले होते. त्यासाठी एअरटेल पेमेंट बँकेत ग्राहकांची विनापरवानगी खातीही उघडली होती.
त्यामुळे दोन्ही कंपन्यांना आधार डाटा बेसचा वापर करून ई-केवायसी करण्यास आधार प्राधिकरणाने बंदी घातली होती.
या कारवाईने हादरलेल्या एअरटेलने गॅसच्या सबसिडीचे १३८ कोटी रुपये ५५.६३ लाख ग्राहकांच्या मूळ बँक खात्यांत जमा केले. त्यानंतर आधार प्राधिकरणाने कंपनीवरील ई-केवायसी बंदी तात्पुरती उठविली आहे.
ई-केवायसी बंदीमुळे ग्राहकांवर होऊ शकणारा संभाव्य परिणाम आणि सीम-फेरपडताळणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली ३१ मार्चची मुदत या बाबी लक्षात घेऊन आधार प्राधिकरणाने दुसरा हंगामी आदेश जारी करून एअरटेलला आधार ई-केवायसीची परवानगी दिली.
रिझर्व्ह बँक आणि दूरसंचार विभागाकडून अहवाल आल्यानंतर १० जानेवारी रोजी प्राधिकरण या प्रकरणाचा आढावा घेईल.
निर्बंध कडकच : सूत्रांनी सांगितले की, आधार प्राधिकरणाने एअरटेल पेमेंट बँकेला आधारची ई-केवायसी सुविधा वापरण्याची परवानगी दिलेली नाही. पुढील सूचना येईपर्यंत बँकेचा ई-केवायसी परवाना निलंबित राहणार आहे. एअरटेलला ई-केवायसीची परवानगी देण्यात आली असली तरी, कंपनीवर कडक अटीही लादण्यात आल्या आहेत.
ग्राहकांचे थेट लाभ हस्तांतरण खाते आधीच्या बँकेकडे सुपुर्द करण्यात आल्याचा मेसेज प्रत्येक ग्राहकाला
२४ तासांत पाठवावा लागणार आहे. एअरटेल पेमेंट बँकेकडे वळविण्यात आलेले सबसिडीचे पैसे मूळ बँकेच्या खात्यावर परत पाठविण्यात आल्याचा मेसेजही ग्राहकांना २४ तासांत पाठवावा लागेल.
एअरटेलला आधार ई-केवायसीची मुभा, पेमेंट बँकेवरील ई-केवायसीचे निर्बंध मात्र कायम
एअरटेलला आधार ई-केवायसी सुविधा वापरण्याची परवानगी आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय) दिली आहे. एअरटेल पेमेंट बँकेवरील ई-केवायसीचे निर्बंध मात्र कायम राहणार आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:04 AM2017-12-23T01:04:22+5:302017-12-23T01:04:34+5:30