नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. या महिन्यापासून सर्वसामान्य ग्राहकांसाठी ई-रुपी (e-rupee) व्यवहाराची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत डिजिटल चलनाची चाचणी सुरू असून त्यात 9 बँकांचा सहभाग आहे. आता हे बँकांसाठी जारी केले गेले आहे, परंतु लवकरच किरकोळ ग्राहक देखील डिजिटल चलनाचा वापर करू शकतील, असे शक्तिकांत दास म्हणाले.
चाचणीच्या पहिल्या दिवशी बँकांनी सरकारी सिक्युरिटीज व्यवहारांमध्ये 275 कोटी रुपयांचे पेमेंट डिजिटल चलनात करण्यात आले. दरम्यान, फिक्की आणि इंडियन बँक्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमात शक्तिकांत दास म्हणाले की, लवकरच आम्ही किरकोळ ग्राहकांनाही ई-रुपी ही सुविधा उपलब्ध करून देऊ. डिजिटल चलनाची पारदर्शकता राखण्यासाठी काम सुरू असून लवकरच त्याचा देशभरात वापर सुरू होईल.
आम्ही डिजिटल चलन लाँच करण्याची कोणतीही घाई करत नाही. सामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यापूर्वी सर्व पैलू तपासायचे आहेत. हे चलन आल्यानंतर व्यवसाय क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. हेच कारण आहे की सध्या डिजिटल चलन लाँच करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही, परंतु आम्ही नोव्हेंबरमध्येच सामान्य ग्राहकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. जागतिक अर्थव्यवस्था सध्या मोठ्या बदलातून जात असून सर्व मोठे देश आपली आर्थिक धोरणे बदलत आहेत, असेही शक्तिकांत दास यांनी सांगितले.
या काळात संपूर्ण जग आव्हानांना तोंड देत आहे आणि या काळात भारताची अर्थव्यवस्थाही मजबूत दिसत आहे. महागाईचा दबाव असूनही, आमचा विकास दर हा जगातील सर्वात वेगवान आहे आणि पुढे जाऊन तो कायम ठेवण्यास सक्षम असणार आहे. सणासुदीच्या हंगामात बंपर विक्री आणि ग्राहकांची वाढती मागणी यामुळे अर्थव्यवस्था योग्य मार्गावर जात असल्याचे चित्र दिसत आहे, असेही शक्तिकांत दास म्हणाले.
महागाईवर बारकाईने लक्ष
याचबरोबर, शक्तिकांत दास यांनी महागाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रयत्नांनंतरही महागाई 6 टक्क्यांच्या खाली आणण्यात यश आलेले नाही. आम्ही महागाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी पावले उचलली जातील. महागाई आणि आर्थिक धोरणांबाबतची आमची रणनीती जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळेच आम्ही एमपीसीची 3 नोव्हेंबरला बैठक बोलावली आहे. महागाई आटोक्यात येत नसल्याच्या कारणाबाबत सरकारसमोर आमची बाजू मांडणार असून त्याची माहिती सार्वजनिक करणार आहोत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणखी कठोर पावले उचलली तर त्याचा फटका देशाला सहन करावा लागू शकतो, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले.