Join us  

ई-शॉपिंगचा मॉलना फटका

By admin | Published: September 06, 2015 9:48 PM

आॅनलाईन शॉपिंगच्या वाढत्या आकर्षणाची सर्वांत जास्त झळ मॉलना बसली आहे. या मॉलमधील २० ते २५ टक्के जागा रिक्त झाल्या असून, मॉलचे भाडेही ३० टक्क्यांपर्यंत घटले आहे.

नवी दिल्ली : आॅनलाईन शॉपिंगच्या वाढत्या आकर्षणाची सर्वांत जास्त झळ मॉलना बसली आहे. या मॉलमधील २० ते २५ टक्के जागा रिक्त झाल्या असून, मॉलचे भाडेही ३० टक्क्यांपर्यंत घटले आहे.‘अ‍ॅसोचेम’ या व्यावसायिक व औद्योगिक संघटनेच्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि अन्य २०० देशांतही अशीच परिस्थिती असून, त्यास अनुरूप अशीच भारतातील स्थिती आहे. अमेरिकेत मॉलमध्ये ४६ टक्के, तर ब्रिटनमध्ये ३२ टक्के जागा रिक्त आहेत.दुसरीकडे भारतात आॅनलाईन खरेदीच्या मागणीवर मंदीचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. पुढील पाच वर्षांत भारतात आॅनलाईन खरेदी वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढून १०० अब्ज डॉलरचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. ‘अ‍ॅसोचेम’ आणि प्राईस वॉटर हाऊस कूपर्स (पी डब्ल्यू यू सी)च्या अभ्यासानुसार याक्षणी भारतात ई-कॉमर्सचा उद्योग १७ अब्ज डॉलरचा आहे. २०१५ मध्ये हा उद्योग आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. सध्या आॅनलाईन खरेदी ६५ टक्के आहे, ती २०१६ मध्ये वाढून ७२ टक्के होण्याची शक्यता आहे.आॅनलाईन खरेदीत प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक सामान, पुस्तके, संगीत, कपडे, क्रीडाविषयक सामानाच्या खरेदीवर भर आहे. अभ्यासाचा हा निष्कर्ष जारी करताना अ‍ॅसोचेमचे महसचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, इंटरनेटचा वापर जसजसा वाढत आहे, तसतशी आॅनलाईन खरेदी वाढत आहे.