Join us

ई-श्रम पोर्टलवर 28 कोटी कामगारांची नोंदणी; तुम्हीही केल्यास मिळेल 2 लाखांचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 3:10 PM

e-Shram Card Registration Benefits :असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ई-श्रम कार्डद्वारे सामाजिक सुरक्षिततेची हमी मिळते. प्रत्येक कामगाराला सरकारकडून 2 लाख रुपयांची विमा सुविधा मिळते.

नवी दिल्ली : मोदी सरकार  (Modi Government) देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अनेक योजना आणत आहे. त्यापैकी एक योजनेचे नाव आहे, ई-श्रम कार्ड योजना. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रात (Unorganised Sector) काम करणाऱ्या लोकांना बसला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रमिक कार्ड योजना सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रोजंदारीने काम करणाऱ्या मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील सुमारे 28 कोटी कामगारांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, सुरक्षारक्षक, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा समावेश आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.

योजनेद्वारे मिळेल 'हा' लाभअसंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ई-श्रम कार्डद्वारे सामाजिक सुरक्षिततेची हमी मिळते. प्रत्येक कामगाराला सरकारकडून 2 लाख रुपयांची विमा सुविधा मिळते. एखाद्या अर्जदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा लाभ मिळतो. त्याचबरोबर ई-श्रम कार्डधारकाचे अपघातात अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. या विम्यासाठी कार्डधारकाला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. हा विमा पंतप्रधान सुरक्षा विमा संरक्षण अंतर्गत दिला जातो. यासोबतच राज्य सरकार या कार्डधारकांच्या खात्यावर पैसेही ट्रान्सफर करते.

ई-श्रमिक कार्डसाठी अर्ज कसा करावा?ई-श्रमिक कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही ऑनलाइन अर्जही (Online Registration) करू शकता. यासाठी तुम्हाला श्रमिक पोर्टलच्या eshram.gov.in या वेबसाइटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यानंतर, तुम्ही सबमिट (Submit) बटणावर क्लिक करून तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. या अर्जासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number),  आधार कार्ड (Aadhaar Card), बँक खाते (Bank Account) असणे आवश्यक आहे.

टॅग्स :व्यवसायकर्मचारी