लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सदोष बॅटऱ्यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या असल्याचा निष्कर्ष संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) आग, स्फोटके व पर्यावरण सुरक्षा प्रयोगशाळेने (सीएफईईएस) काढला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची चौकशी करण्याची जबाबदारी डीआरडीओकडे दिली होती. सोमवारी आपल्या चौकशीचा अहवाल त्यांनी परिवहन मंत्रालयास सादर केला. त्यात सदोष बॅटऱ्यांना आगीस जबाबदार धरले आहे. सूत्रांनी सांगितले की, परिवहन मंत्रालयाने गेल्याच आठवड्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले होते. दुचाकींना लागणाऱ्या आगीच्या निष्कर्षावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना कंपन्यांना यावेळी देण्यात आल्याचे समजते. या कंपन्यात ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा ऑटोटेक, प्योर ईव्ही, जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि बूम मोटर्स यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, कंपन्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगळुरूलाही या चौकशीत सहभागी करून घेण्यात आले होते.
एका महिन्यात २४ घटना
n मागील काही महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आग लागण्याच्या जवळपास अर्धा डझन घटना समोर आल्या होत्या.
n ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी यावर चिंता व्यक्त करताना म्हटले होते की, सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
n आम्ही याची तपासणी करीत आहोत. आम्ही ते लवकरच ठीक करू.