नवी दिल्ली – छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशाने परत मागे घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी-सकाळी पीएमओ कार्यालयातून अर्थ विभागाला आदेश देण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ वाजता अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून छोट्या बचत योजनेवरील व्याजदर कपात करण्याचा निर्णय मागे घेत असल्याची माहिती दिली.
व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेण्याची वेळ महत्त्वपूर्ण आहे, कारण बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु होण्यापूर्वी हा निर्णय घेतला. अर्थमंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं की, व्याजदरात कपातीचा जो निर्णय घेतला होता, तो मागे घेतला जात आहे, त्यामुळे मागच्या तिमाहीमध्ये जे व्याजदर होते ते कायम राहतील असं सांगितलं. रातोरात सरकारने हा निर्णय बदलल्याने विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं.
देशातील जवळपास ८० टक्क्याहून अधिक लोक छोट्या बचत योजनेत पैसे गुंतवणूक करतात, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या लोकप्रिय योजना आहेत, ज्याठिकाणी गुंतवणूक करून चांगली कमाई केली जाते. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, व्याजदरात बदल करण्याचा आदेश मागे घेण्याबाबत PMO कार्यालयातून सकाळी देण्यात आला. त्यानंतर एक तासात नवीन व्याजदर मागे घेण्यात आले. हा गंभीर प्रकार होता. सकाळी ७.५४ मिनिटांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
व्याजदरात कपात करण्याचा निर्णय सहज घेतला नाही, विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आला होता, यात चर्चा करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचे विविध विभाग, पोस्ट विभाग, भारतीय रिझर्व्ह बँकचे अधिकारी उपस्थित असतात. या बैठकीत शिफारशीनंतर अर्थमंत्र्यांच्या परवानगीने नोटिफिकेशन जारी केले जाते, यावेळीही या संपूर्ण प्रक्रियेचे पालन केले गेले.
काय होता निर्णय?
अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर 1.10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते. 1 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का देत व्याज दरात 70 बेसिस पॉईंटची कपात केली होती. पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के होता. परंतु केंद्राच्या निर्णयामुळे तो 6.4 टक्क्यांवर आला होता. मात्र आता पूर्वीप्रमाणेच 7.1 टक्के व्याजदर मिळणार आहे. पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील (National Savings Certificate) व्याजदरातही 90 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आधी गुंतवणुकीवर 6.8 टक्के व्याज मिळायचं. हे व्याजदर आता कायम राहणार आहे.