नवी दिल्ली : यू-ट्यूब, फेसबुक अथवा एक्स यासारख्या समाज माध्यम मंचावरून उत्पन्न मिळत असल्यास ते आपण नोकरी करत असलेल्या कंपनीला कळविणे आवश्यक आहे का तसेच नोकरी करत असताना समाज माध्यमांवरून उत्पन्न घेता येते का? असे प्रश्न हल्ली चर्चेत आले आहेत. चला आज त्यांची उत्तरे जाणून घेऊया.
एकापेक्षा अधिक स्रोतांकडून उत्पन्न मिळविण्यापासून रोखणारा कायदा देशात नाही. त्यामुळे समाज माध्यमांवरील उत्पन्न घेण्यात अडचण नाही. मात्र, तुम्ही कंपनीसोबत करार करून अन्य स्रोतांपासून उत्पन्न मिळविणार नाही, असे बंधन घालून घेतले असेल तर मात्र कराराचे स्वरूप काय आहे, त्यानुसार सर्व काही ठरेल.
उत्पन्नाचे अन्य स्रोतउत्पन्नाच्या अन्य स्रोतांत समाज माध्यमांबरोबरच तुम्ही ‘फ्यूचर अँड ऑप्शन’ म्हणजेच वायदे बाजारात ट्रेडिंग करून उत्पन्न मिळवत असाल, तर तुम्हाला त्याची माहिती तुमच्या कंपनीच्या एचआर विभागाला द्यावी लागू शकते. मात्र, याबाबत कोणताही लिखित कायदा अस्तित्वात नाही.
काय आहेत निकष?तुम्ही जेथे नोकरी करता त्या कंपनीचे घोषणा निकष (डिसक्लोजर क्रायटेरिया) काय आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. कंपनीला काय काय कळविणे तुमच्यासाठी आवश्यक आहे, याची माहिती या निकषांत असते.