- चंद्रकांत दडस
अनेक लोकांना वाटते की, सोने खरेदी केले म्हणजे सोन्यात गुंतवणूक केली. मात्र तसे नसते, सोने खरेदी केल्याने केवळ ते कार्यक्रमापुरते घालून इतर वेळी घरातच पडून राहते. त्यातच ते चोरीला जाण्याचीही भीती असते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी सोने गुंतवणुकीतील इतर पर्यायांमध्ये पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर ठरेल.
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकगेल्या काही वर्षांत गुंतवणुकीचा हा पर्याय खूप लोकप्रिय झाला आहे. अनेक मोबाइल ई-वॉलेट, ब्रोकरेज कंपन्यांच्या माध्यमातून ते सहज खरेदी किंवा विक्री करता येते. डिजिटल सोन्याची किंमतदेखील सोन्याच्या सामान्य बाजारभावाच्या आधारावर ठरवली जाते. यावर कोणतेही मेकिंग चार्ज किंवा कोणतीही स्टोरेज फी भरावी लागत नाही.
गोल्ड ईटीएफदेशांतर्गत बाजारात सोन्यात गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड असतात. त्याला ईटीएफ असे म्हटले जाते. आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक करता येते. हे ईटीएफ स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध असतात आणि अतिशय सुरक्षित असतात. येथे परतावादेखील चांगला आहे. गोल्ड ईटीएफचे एक युनिट १ ग्रॅम इतके असते. ग्राहकाला हवे असल्यास तो युनिटही खरेदी करू शकतो. प्रत्येक महिन्यात यात शेकडो कोटींची गुंतवणूक गुंतवणूकदार करतात.
गोल्ड म्युच्युअल फंड हे गोल्ड ईटीएफपेक्षा वेगळे आहेत. ते प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करत नाहीत. पण, सोन्याच्या मालमत्तेशी संबंधित कंपन्या किया फंडांमध्ये गुंतवणूक करतात.
सार्वभौम सुवर्ण रोखेसोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक अतिशय लोकप्रिय आणि सुरक्षित मार्ग आहे. याला आरबीआय जारी करते. आरबीआय हे सुवर्ण रोखे सरकारच्या नावाने जारी करते. यावर वार्षिक व्याजही मिळते. हे सोन्याच्या वजनाच्या आधारावर खरेदी केले जाते आणि त्याची मुदत आठ वर्षांची असते, परंतु, तुम्ही पाच वर्षांनंतरही पैसे काढू शकता. ग्राहक त्यावर कर्जदेखील घेऊ शकतात आणि त्यावर टीडीएस भरावा लागत नाही.