लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : समाज माध्यम प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील (पूर्वाश्रमीचे ट्विटर) जाहिरात महसूल भागीदारी योजनेत वापरकर्त्यास होणाऱ्या उत्पन्नास जीएसटी कायद्यानुसार ‘पुरवठा’ मानण्यात येऊन त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारण्यात येणार आहे.
२० लाखांच्यावर उत्पन्न गेल्यास जीएसटी लागू होईल. अशा वापरकर्त्यांना जीएसटी नोंदणी करणेही बंधनकारक असेल. मिझोरम, मेघालय आणि मणिपूर यांसारख्या काही विशेष श्रेणीतील राज्यांत यासाठी उत्पन्न मर्यादा १० लाख रुपये आहे.
असा आकारणार जीएसटी
‘एएमआरजी अँड असोसिएट्स’चे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीस वर्षभरात बँकेतील ठेवींवरील व्याजाद्वारे २० लाख रुपये मिळाले तसेच ‘एक्स’वरही त्यास १ लाख रुपये मिळाले; तर त्याची एकूण कमाई २१ लाख रुपये मानली जाईल. त्यातील सवलत मर्यादेचे २० लाख रुपये वगळून उरलेल्या १ लाख रुपयांवर १८ टक्के जीएसटी लागेल.