सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर सध्या व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड वाढत आहे. याला व्लॉगिंग असंही म्हणतात. खरं तर, आता बरेच लोक कोणत्याही गोष्टीची माहिती घेण्यासाठी यूट्यूबवर (YouTube) जाणं पसंत करतात. त्यामुळे व्लॉगर्सचा आवाका वाढत आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळतं. परंतु, बहुतेक लोकांना YouTube कमाईवरील टॅक्सच्या नियमांची माहिती नसते. यामुळेच गेल्या काही महिन्यांत आयकर विभागानं यूट्यूबर्सना नोटीस पाठवल्याच्या अनेक बातम्या समोर आल्यात. जर तुमच्याकडेही यूट्यूब चॅनल असेल आणि तुम्ही तुमच्या व्हिडीओंमधून कमाई करत असाल, तर त्याच्याशी संबंधित कराच्या नियमांबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
काय आहेत नियम?
यूट्यूबवरून कमाई करण्यावर करासंबंधित नियम काय असतील, ते तुम्ही यूट्यूबवरून किती कमावतात यावर अवलंबून आहे. जर ती तुमची सर्वात मोठी कमाई असेल किंवा तुमची मुख्य कमाई असेल, तर ती व्यवसायातून झालेली कमाई मानली जाईल. या प्रकरणात, त्यावर 'प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस प्रोफेशन' अंतर्गत कर आकारला जाईल. आता आपण दुसऱ्या परिस्थितीचा विचार करू. समजा तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत यूट्यूब व्हिडीओ बनवता. यातून तुमची केवळ थोडीफार कमाई होत असेल तर या प्रकरणात, हे उत्पन्न इतर स्त्रोतांकडून मिळणारं उत्पन्न मानलं जाईल.
प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनच्या वापराची परवानगी
जर यूट्यूबद्वारे कमावलेली कमाई व्यावसायिक उत्पन्न मानली गेली, तर तो आयकर कायद्याच्या कलम 44AD किंवा 44ADA अंतर्गत प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनच्या पर्यायाचा वापर करता येऊ शकतो. या प्रकरणात, व्यक्तीला कलम 44AB अंतर्गत बुक्स ऑफ अकाऊंट अंतर्गत अकाऊंट मेंटेन केल्याशिवाय प्रिझम्प्टिव्ह बेसिसवर कर भरावा लागेल. आयकराच्या नियमांनुसार, जर उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर कलम 44AB अंतर्गत बुक्स ऑफ अकाऊंट मेंटेन करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
किती असेल टॅक्सचा दर
याबाबत एक मोठा प्रश्न असा आहे की करदात्याला यूट्यूब वरून होणाऱ्या कमाईवर किती कर भरावा लागेल? या संदर्भात तज्ज्ञ म्हणाले की, यूट्यूबरची कमाई व्यवसायातून मिळणारं उत्पन्न असो किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न असो, टॅक्स स्लॅबनुसार कराचा दर लागू होईल. याचा अर्थ असा की जर त्या व्यक्तीला आयकराची जुनी पद्धत वापरायची असेल आणि त्याचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याचे उत्पन्न 2.5 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर तो 5 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये येईल. 5 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाईल. 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर असेल.