Join us  

महिन्यात कमाई ५३ लाख काेटी, सेन्सेक्स उच्चांकाची हॅट्ट्रिक, प्रथमच ८० हजारांवर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 6:31 AM

बँका, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सरकारला माेठ्या प्रमाणावर जीएसटी प्राप्त झाला आहे.

मुंबई - शेअर बाजाराने उच्चांकाची हॅटट्रिक नाेंदवीत सलग तिसऱ्या दिवशी विक्रम नाेंदविला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स प्रथमच ८० हजारांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेदेखील नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स ६२ अंकांनी वाढून ८०,०४९ वर, तर निफ्टी १५ अंकांनी वधारून २४,३०२ अंकांवर बंद झाला. तर गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांनी ५३ लाख काेटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स १,०१७ अंकांनी वधारला आहे. गुरुवारी दिवसभरात सेन्सेक्सने ८०,३९२ ही उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर काही अंकांची घसरण झाली. बँका, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सरकारला माेठ्या प्रमाणावर जीएसटी प्राप्त झाला आहे. याशिवाय कॉर्पाेरेट कर संकलनाही वाढले आहे. याचाही सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.

४४७ लाख काेटींवर बाजार भांडवल

गेल्या महिनाभरात गुंतवणूकदार ५३ लाख काेटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत. ४ जून राेजी लाेकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बाजार आपटल्यामुळे सेन्सेक्समधील कंपन्यांचे बाजार भांडवल ३९४ लाख काेटींवर आले हाेते. ४ जुलै राेजी हा आकडा ४४७ लाख काेटींवर पाेहाेचला आहे.

पुढे काय?

माेठ्या रॅलीची शक्यता कमी आहे. सेन्सेक्स ९० हजारांचा टप्पा ६ महिन्यांत गाठू शकताे. मात्र, अर्थसंकल्प, नव्या सरकारचा १०० दिवसांचा अजेंडा, मान्सून, महागाई आदी महत्त्वपूर्ण ठरतील. 

बाजार तेजीत, सतर्क राहा - सरन्यायाधीश

शेअर बाजार तेजीत असताना सतर्क राहा, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बाजार नियामक सेबी आणि प्रतिभूती अपील न्यायाधिकरणास (सॅट) गुरुवारी दिला. प्रतिभूती अपील न्यायाधिकरणाच्या (सॅट) नवीन संकुलाचे उद्घाटन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, सॅटची आणखी नवीन पीठे स्थापन करण्याची आवश्यकता आहे. शेअर बाजारातील व्यवहार वाढले आहेत. तसेच नवीन नियम आले आहेत. त्यामुळे कामाचा भार वाढला आहे. त्याचा निपटारा करण्यासाठी अधिक पीठांची गरज आहे. विजयानंतर सर्वांनी आपले संतुलन आणि धैर्य कायम ठेवायला हवे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार