नवी दिल्ली : सोमवारी जगभरातील शेअर बाजरात झालेल्या ‘आपटबारा’स अमेरिकेने शुक्रवारी जारी केलेल्या रोजगारविषयक आकडेवारीचा अहवाल कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची चाहूल लागल्याचे मानले जात आहे.
अमेरिकेच्या ‘ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’ने शुक्रवारी रोजगारविषयक डेटा जारी केला. जुलैमध्ये अमेरिकेतील नवीन नोकऱ्या घसरून १.१४ लाखांवर आल्या. आतापर्यंत दरमहा सरासरी २.१५ लाख नोकऱ्या निर्माण होत होत्या. जुलैमध्ये अमेरिकेतील बेरोजगारीत सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे.
जुलै २०२४ मध्ये बेरोजगारीचा दर ०.२ टक्के वाढून ४.३ टक्के झाला. जूनमध्ये तो ४.१ टक्के, तर मेमध्ये ४ टक्के होता. जुलैमधील बेरोजगारीचा आकडा ऑक्टोबर २०२१ नंतरचा सर्वोच्च आहे.
सोमवारच्या पडझडीनंतर भारताचा अस्थिरता निर्देशांक (व्हीआयएक्स) ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. २०१५ नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. हा निर्देशांक बाजारातील अस्थिरता दर्शवितो. इंडेक्स २३ अंकांच्या पुढे गेला आहे.
अमेरिकी अर्थव्यवस्थेत मंदीचे संकेत मिळताच गुंतवणूकदार बाजारातील आपला पैसा काढून घेतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावेळीही तेच घडताना दिसत आहे. भारतीय शेअर बाजारालाही याचा फटका बसला आहे.
अमेरिकेत ३.५२ लाख लोक बेरोजगार
जुलै २०२४ मध्ये अमेरिकेत ३.५२ लाख लोक बेरोजगार झाले. एकूण बेरोजगारांची संख्या ७२ लाख आहे.
११ लाख लोक असे आहेत, ज्यांना हंगामी नोकरीवरून काढले आहे. त्यांना पुन्हा नोकरीवर घेतले जाऊ शकते.
१७ लाख लोकांना नोकरीवरून कायम स्वरूपी काढून टाकण्यात आले आहे. अमेरिका मंदीच्या सावटाखाली असल्याचे संकेत या अहवालाने दिले आहेत.
भारतातील या क्षेत्रांवर होणार सर्वाधिक परिणाम
मंदीचा भारतीय उद्योगांवरही परिणाम होताे. अमेरिकेवर अवलंबून असलेल्या वाहन, ऊर्जा, आयटी क्षेत्रातील कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळेच या कंपन्यांचे समभाग घसरले आहेत.
अमेरिकेतील बेरोजगारीमुळे वस्तू उत्पादनात घट होऊन जागतिक मागणी घसरते. याचा परिणाम म्हणून भारताची निर्यात घसरणार आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येईल.
कृष्णवर्णीय, आफ्रिकी वंशाच्या लोकांना फटका
जुलै २०२४ मध्ये अमेरिकेतील पुरुषांतील बेरोजगारीचा दर ४ टक्के, तर महिलांतील बेरोजगारीचा दर ३.८ टक्के राहिला. कृष्णवर्णीय व आफ्रिकी वंशाच्या लोकांमधील बेरोजगारीचा दर सर्वाधिक ६.३ टक्के राहिला. जुलै २०२३ मध्ये तो ५.७ टक्के होता.