India-Maldives Spat: मालदीवच्या मंत्र्यांच्या टिपण्ण्यांनंतर भारत आणि मालदीवमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला आता मोठा झटका बसला आहे. मालदीवच्या मंत्र्यांच्या अपमानजनक टिपण्ण्यांनंतर ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी EaseMyTrip नं मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले होते आणि फ्लाइट बुकिंग देखील बंद केले होते. आता मालदीवच्या प्रवासी संघटनेनं ९ जानेवारी रोजी EaseMyTrip चे सीईओ निशांत पिट्टी यांना आपला निर्णय बदलण्याची विनंती केली आहे. मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्सनं त्यांच्याकडे ही विनंती करत दोन्ही देशांना जोडणारा धागा हा राजकारणापलिकडचा असल्याचं म्हटलंय. दोन्ही देशांतील टुअर ऑपरेटर्स केवळ व्यावसायिक भागीदारच नाही, तर भावंडांप्रमाणे असल्याचं मालदीवच्या ट्रॅव्हल असोसिएशननं म्हटलंय.
EaseMyTrip नंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा मालदीववर बहिष्कार, प्रवासासाठी विमा देणार नाही
मालदीवच्या पर्यटन क्षेत्राच्या यशात भारतीय बाजारपेठ ही एक आवश्यक शक्ती आहे, म्हणजेच भारताशिवाय मालदीवचे पर्यटन क्षेत्र भरभराटीस येऊ शकत असं वक्तव्य ट्रॅव्हल बॉडीचे अध्यक्ष अब्दुल्ला घियास यांनी केलं. मालदीवची गेस्ट हाऊस आणि लहान-मध्यम आकाराच्या कंपन्यांना (एसएमई) भारतीय पर्यटकांचा मोठा पाठिंबा मिळतो, असंही ते म्हणाले. अशा परिस्थितीत, त्यांनी निशांत यांच्याकडे सकारात्मक संबंध वाढवण्यासाठी, गैरसमज दूर करण्यासाठी आणि मालदीवला EaseMyTrip द्वारे उड्डाणं पुन्हा सुरू करण्यासाठी मदत आणि समर्थन मिळविण्याची विनंती केली आहे.
पर्यटन क्षेत्र किती महत्त्वाचं ?
मालदीव ट्रॅव्हल बॉडीच्या मते, पर्यटन क्षेत्र त्यांच्या देशासाठी फार महत्त्वाचं आहे. हे मालदीवच्या जीडीपीच्या दोन तृतीयांश पेक्षाही अधिक आहे आणि मालदीवच्या सुमारे ४४ हजार नागरिकांना रोजगार प्रदान करतं. अशा परिस्थितीत पर्यटनाला धक्का बसला तर मालदीवची अर्थव्यवस्था आणि अनेक लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होईल, असं मालदीवच्या ट्रॅव्हल बॉडीचं म्हणणं आहे.