लंडन : भारतात आर्थिक धोरणे ठरविणे सोपे आहे. तथापि, त्यांची अंमलबजावणी करणे अवघड आहे. विशेषत: धोरणांना राजकीय स्वीकारार्हता मिळविणे कठीण असून, त्यासाठी थोडी चतुराईची गरज असते, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले.केंब्रिज विद्यापीठात मार्शल व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना राजन यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, आर्थिक धोरणांच्या राजकीय स्वीकारार्हतेच्या बाबतीत तुम्ही अगदीच रेटारेटी करून वाट काढता येत नाही. त्यासाठी चतुराईनेच काम करावे लागते. आपल्या धोरणात तुम्हाला अशा काही जागा शोधाव्या लागतात, जेथे थोडा बदल केला तरी मूळ धोरणाला काही फरक पडत नाही. तथापि, अशा बदलाने ते धोरण राजकीय पातळीवर स्वीकारार्ह बनते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारताची अर्थव्यवस्था पायाभूत स्वरूपाच्या अर्थशास्त्रावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ असलेल्या राजन यांनी म्हटले की, वास्तविक बहुतांश धोरणे ठरविणे हे मूलभूत अर्थशास्त्र आहे. माझ्या मते आर्थिक धोरणांना राजकीय पातळीवर स्वीकारार्ह बनविण्याचा तुम्ही प्रयत्न करता, तेव्हा खऱ्या अर्थाने गहन आर्थिक जाण तुम्हाला येते. तुम्हाला भारताची आर्थिक धोरणे ठरविणे सोपे काम वाटते का, या प्रश्नावर राजन यांनी गमतीने म्हटले की, धोरणे बनविणे सोपे आहे, त्यांची अंमलबजावणी करणे कठीण आहे.
धोरणे ठरविणे सोपे, लागू करणे अवघड
By admin | Published: May 13, 2016 4:39 AM