मुंबई : मागील काही काळात बँकांच्या तुलनेत पोस्टानेही गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय म्हणून सामान्यांच्या मनात जागा मिळविली आहे. काळानुरूप कात टाकल्याने पोस्टाच्या योजनांना मिळणारा प्रतिसादही वाढता आहे.
आता याच योजनांचा आधार घेऊन कर्ज बँकाच्या जाचक अटी व नियमांना बळी न पडता पोस्टात कर्ज मिळण्याची प्रक्रियाही सोपी आहे. पोस्ट ऑफिस आरडी चक्रवाढ व्याज मॉडेलवर चालते. याचा अर्थ व्याज तिमाहीत मोजले जाते आणि तुमच्या मूळ रकमेत जोडले जाते. या चक्रवाढ परिणामामुळे तुमच्या बचतीत लक्षणीय वाढ होऊन पाच वर्षांच्या कालावधीत नफा होतो.
कर्जाची परतफेड
पोस्टाच्या आरडीवर काढलेल्या कर्जाची परतफेड करणे सोपे आहे. यामध्ये एकरकमी पेमेंट किंवा समान मासिक हप्ते निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तथापि, कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी परतफेडीच्या वेळापत्रकाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
आवर्ती खात्याच्या योजनेवर कर्ज
पोस्ट ऑफिस आरडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त १०० रुपयांमध्ये आरडी खाते उघडू शकता. ज्यामुळे ते अक्षरशः कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकते.
पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या आरडीवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर १२ हप्ता ठेवी असाव्यात आणि खाते एक वर्ष जुने असावे. आरडी खातेधारकाला पोस्ट ऑफिसमधून त्याच्या खात्यातील शिल्लक रकमेच्या ५० टक्के कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते.
असे मिळेल कर्ज
पोस्ट ऑफिस आरडीवर कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी, सरळ प्रक्रिया फॉलो करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पोस्ट ऑफिसला भेट द्या, अर्ज भरा आणि पासबुक झेरॉक्ससह अर्ज सबमिट करा. एकदा तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पोस्ट ऑफिसकडून एकूण आवर्ती ठेवीच्या ५०% कर्ज बँक अकाऊंटला जमा केले जाते.